Coronavirus : ...तर डेल्टा ठरतो लसीवरही भारी; केवळ एक डोस ठरत नाही परिणामकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 06:22 AM2021-07-11T06:22:24+5:302021-07-11T06:24:41+5:30
Coronavirus : सध्या डेल्टा प्लसनं डोकं काढलंय वर. डेल्टा व्हेरिएंट कोरोनाप्रतिबंधक लसीच्या एका डोसने नियंत्रणात येत नसल्याचे आढळून आले आहे.
कोरोनाची दुसरी लाट अजून तरी पूर्णपणे ओसरलेली नाही. त्यातच डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले आहे. कोरोनाच्या डेल्टानामक व्हेरिएंटची पुढची पायरी डेल्टा प्लस विषाणू आहे. डेल्टा व्हेरिएंट कोरोनाप्रतिबंधक लसीच्या एका डोसने नियंत्रणात येत नसल्याचे आढळून आले आहे.
काय आढळले संशोधनात?
ॲस्ट्राझेनेका आणि फायझर-बायोएन्टेक या लसींचे डोस घेणाऱ्यांवर डेल्टासाठी संशोधन करण्यात आले. या लसींचे प्रत्येक एक डोस दिले असता ते डेल्टाला निष्प्रभ करू शकले नाहीत. मात्र, लसीच्या दोन डोसमुळे डेल्टावर परिणाम झाल्याचे संशोधनात आढळून आले.
पॅरिस येथील पाश्चर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी यावर अभ्यास केला असून त्यासंदर्भातील अहवाल नेचर या मासिकात प्रकाशित झाला आहे. दोन्ही डोसमुळे प्रतिकारशक्ती वाढीस लागते आणि अँटिबॉडीज मोठ्या प्रमाणात तयार होतात.
डेल्टा व्हेरिएंट अनेक देशांत सक्रिय
भारतात दुसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरलेला डेल्टा व्हेरिएंट अमेरिकेसह ९८ देशांमध्ये पसरलेला आहे. अमेरिका, मलेशिया, पोर्तुगाल, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये त्याचा फैलाव अधिक आहे.वर्षाच्या सुरुवातील युरोप आणि ब्रिटनमध्ये डेल्टाचे हजारो संक्रमित सापडले होते. सद्य:स्थितीत डेल्टा व्हेरिएंटने अमेरिकेची चिंता वाढवली आहे. भारतात हा व्हेरिएंट प्रथम गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आढळून आला आणि मे २०२१ मध्ये तो धोकादायक म्हणून घोषित करण्यात आला.
डेल्टासाठी विशेष लस
डेल्टा व्हेरिएंटविरोधात फायझर आणि बायोएन्टेक विशेष लसीची निर्मिती करत आहेत. ऑगस्टपासून दोन्ही कंपन्या या विशेष लसीसाठी नैदानिक चाचण्या सुरू करणार आहेत. त्याचबरोबर बूस्टर डोसची निर्मितीही या कंपन्या करणार आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत बूस्टर डोससंदर्भातील अहवाल दोन्ही कंपन्या अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे सोपविणार आहेत.