CoronaVirus News: कोरोना रुग्णांना पालथं का झोपवतात, माहित्येय का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 04:02 AM2020-06-14T04:02:16+5:302020-06-14T06:51:54+5:30

ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आहेत व रुग्णालयात दाखल झालेले नसून घरीच उपचार घेत आहेत अशांनी ही पालथे म्हणजेच पोटावर झोपावे.

CoronaVirus Do you know why Corona patients sleep on their stomach | CoronaVirus News: कोरोना रुग्णांना पालथं का झोपवतात, माहित्येय का?

CoronaVirus News: कोरोना रुग्णांना पालथं का झोपवतात, माहित्येय का?

Next

ज्या कोरोनाबाधितांना रुग्णालयात दाखल केले जाते त्यांच्यासाठी पालथे झोपणे हा उपचाराचा एक भाग आहे. पण जे लक्षणविरहीत कोरोना संसर्गित आहेत व ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी सौम्य लक्षणे आहेत व रुग्णालयात दाखल झालेले नसून घरीच उपचार घेत आहेत अशांनी ही पालथे म्हणजेच पोटावर झोपावे. पालथे झोपल्याने कोरोना झाल्यावर शरीरात ऑक्सिजन कमी पडण्याची शक्यता कमी होते व ऑक्सिजन कमी पडत असेल तर ते भरून निघते व व्हेंटिलेटरची गरज काही प्रमाणात कमी होऊ शकते. अर्थात पालथे झोपून ही शरीरात ऑक्सिजनची पातळी मेंटेन राहत नसेल तर व्हेन्टीलेटरचा वापर करावा लागतो. लक्षणविरहीत व सौम्य लक्षणे असलेल्यांना घरी ठेवले जाते व फारसे उपचार नसतात. अशांसाठी पालथे झोपण्याचे विशेष महत्त्व आहे.

पालथे झोपल्याने नेमके काय होते?
पालथे झोपल्याने फुफ्फुसाचा मागच्या बाजूचा व झोपल्यावर वरच्या म्हणजे पाठच्या बाजूला येणारा भाग खुला होता व फुफ्फुसाच्या इतर भाग अधिक खुला होतो व याला ही ऑक्सिजन मिळू लागते. उभ्याने किंवा पाठीवर झोपून हा खालच्या व मागच्या बाजूला जाणारा फुप्फुसाचा भाग फारसा उपयोगात येत नाही. म्हणून पालथे झोपल्याने फुप्फुसाच्या जास्तीत जास्त भाग काम करू लागतो व ऑक्सिजनचे प्रमाण वाढते.

अजून एका कारणाने पालथे झोपल्याने ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. २०% लोकांना घोरण्याचा आणि झोपेत श्वसन मार्गाच्या वरच्या भागात अडथळा निर्माण झाल्याने शरीराला ऑक्सिजनची कमतरता भासण्याचा आजार असतो. याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियाचा त्रास असतो. हे लठ्ठपणा व मधुमेह असणाऱ्यांमध्ये जास्त आढळते. नेमके हेच कोरोना होण्याची जोखीम जास्त असणारे आजार आहेत. पालथे झोपल्याने पडजीभ व जीभ झोपेत मागे न पडून झोपेत ऑक्सिजन कमी पडण्याचा हा आजार ही कमी होतो आणि शरीराची ऑक्सिजनची पातळी वाढते. पालथे झोपताना एक काळजी घ्यावी. खरे आदर्श पालथे झोपणे म्हणजे कपाळ हे बिछान्याला लागलेले असे आहे ज्या साठी आपण नियमित वापरतो ते बिछाने वापरून असे झोपणे शक्य नाही. म्हणून आपल्याला मान एका बाजूला करून झोपावे लागेल. अशा वेळी सवय नसल्याने मानेला कळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक दिवस आड मान एक एका बाजूला करून झोवे. झोपण्या आधी व उठल्यावर ब्रम्ह मुद्रा म्हणजे मान दोन्ही बाजूला व वर खाली हलवण्याचा व्यायाम ५ ते १०० वेळा करावा .

कोरोना नसलेल्यांनी ही सध्या साथ सुरू असल्याने पालथे झोपावे का?
ज्यांना कोरोना नाही अशांनी पालथे झोपण्याची गरज नाही. कारण आपल्याला नियमित असे झोपण्याची सवय नसते.
- अमोल अन्नदाते, 
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

Web Title: CoronaVirus Do you know why Corona patients sleep on their stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.