Coronavirus: गुड न्यूज! ७३ दिवसांत भारतीयांना मिळणार कोरोना लस; केद्रांकडून मोफत लसीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 07:00 AM2020-08-23T07:00:00+5:302020-08-23T07:32:05+5:30
कोविशिल्ड लशीची चाचणी १७ केंद्रांमधील १६०० लोकांमध्ये २२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये, प्रत्येक केंद्रातील सुमारे १०० लोकांवर कोरोना लशीची चाचणी घेण्यात येत आहे.
नवी दिल्ली - भारताची पहिली कोरोना लस 'कोविशिल्ड' ७३ दिवसांत बाजारात उपलब्ध होईल. कोविशिल्ड ही पुण्यातील बायोटेक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकार देशातील नागरिकांना मोफत कोरोना लसीकरण करणार आहे.
तिसर्या टप्प्याच्या चाचणीचा पहिला डोस
पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी बिझनेस टुडेला मुलाखत देताना सांगितले की, भारत सरकारने आम्हाला विशेष संशोधन प्राधान्य परवाना दिला आहे. या अंतर्गत, आम्ही चाचणी प्रोटोकॉलची प्रक्रिया वेगवान केली आहे जेणेकरुन चाचणी ५८ दिवसात पूर्ण होईल. अशा प्रकारे, तिसर्या टप्प्यातील चाचणीचा पहिला डोस शनिवारी देण्यात आला आहे. दुसरा डोस २९ दिवसांनी दिला जाईल. चाचणीचा अंतिम डेटा दुसरा डोस दिल्यानंतर १५ दिवसांनंतर येईल. यानंतर आम्ही कोविशिल्डला व्यावसायिक वापरासाठी बाजारात आणण्याचे विचार करत आहोत असं ते म्हणाले. यापूर्वी या लसीची चाचणी पूर्ण होण्यासाठी ७ ते ८ महिने लागतील असं सांगितले जात होते.
१७ केंद्रांवर १६०० लोकांमध्ये चाचणीला सुरूवात
चाचणी प्रक्रियेला आतापासूनच वेग आला आहे. कोविशिल्ड लशीची चाचणी १७ केंद्रांमधील १६०० लोकांमध्ये २२ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या प्रक्रियेमध्ये, प्रत्येक केंद्रातील सुमारे १०० लोकांवर कोरोना लशीची चाचणी घेण्यात येत आहे.
अॅस्ट्रा झेनेका(Astra Zeneca) कडून लस विकत घेण्याचे हक्क सीरमने घेतले
ही लस सीरम इंस्टिट्यूटची असल्याचं सूत्रांनी सांगितले. सीरम इंस्टिट्यूटने अॅस्ट्रा झेनेका नावाच्या कंपनीकडून ही लस तयार करण्याचे अधिकार खरेदी केले आहेत. यासाठी सीरम इंस्टीट्यूट अॅस्ट्रा झेनेकाला रॉयल्टी देईल. त्या बदल्यात सीरम इंस्टीट्यूट ही लस भारत आणि जगातील अन्य ९२ देशांमध्ये विकेल.
तत्पूर्वी केंद्र सरकारने संकेत दिले आहेत की, ते थेट सीरम इंस्टीट्यूटकडून कोविशिल्ड लस खरेदी करतील आणि कोरोना लस भारतीयांना मोफत देतील. भारत सरकार जून २०२२ पर्यंत सीरम इन्स्टिट्यूटकडून ६८ कोटी लस खरेदी करेल. केंद्र सरकार राष्ट्रीय लसीकरण अभियानांतर्गत भारतीयांना मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे. भारताची लोकसंख्या सध्या सुमारे १३० कोटी आहे. सीरमकडून ६८ कोटी डोसची खरेदी केल्यानंतर उर्वरित लशीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांच्या कोवाक्सिन तसेच खासगी फार्मा कंपनी Zydus Cadila द्वारे विकसित होत असलेल्या ZyCoV-D ऑर्डर देऊ शकतात. मात्र या कंपन्यांच्या कोरोना लस चाचण्या यशस्वी झाल्या पाहिजेत. 'बिझनेस टुडे' यांनी हे वृत्त दिलं आहे.
भारत बायोटेकने अद्यापही लशीची चाचणी कधी व केव्हा सुरू होईल हे सांगितले नाही. तथापि, भारत बायोटेकचे सीएमडी कृष्णा अल्ला यांनी म्हटले आहे की, लशीची सुरक्षा आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्यापूर्वी त्याच्या उत्पादनात कोणताही शॉर्ट कट वापरला जाणार नाही. तर दुसरीकडे सीरम इंस्टीट्यूट दरमहा कोरोना लसीचे ६ कोटी डोस तयार करण्याचे काम करत आहे. एप्रिल २०२१ पर्यंत ही क्षमता दरमहा १० कोटी डोस बनवेल.
जगातील सर्वात मोठे लस उत्पादक सीरम इंस्टीट्यूट
लस उत्पादनास गती देण्यासाठी सीरमने आपल्या प्लांटमध्ये बदल केले आहेत आणि त्यावर २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. सीरम इन्स्टिट्यूट जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. या कंपनीची क्षमता १६५ दिवसात १५० कोटी लस तयार करण्याची क्षमता आहे. बिल एन्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने सीरम इंस्टीट्यूटला ११२५ कोटी रुपये देण्यास सहमती दर्शविली आहे. जेणेकरून ही कंपनी गरीब देशांना १० कोटी कोरोना लस तयार करुन पुरवेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मदतीनंतर सीरम इंस्टीट्यूट एका लसीची किंमत १ हजार रुपयांवरून २५० रुपयापर्यंत कमी करेल.