चिंताजनक! WHO चा सर्व देशांना इशारा; कोरोना लसीच्या भरवशावर राहू नका, आपापली व्यवस्था पाहा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 05:25 PM2020-08-18T17:25:00+5:302020-08-18T18:06:50+5:30
CoronaVirus News & Latest Updates : जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातील देशांनी कोरोना व्हायरसच्या लसीसाठी वाट पाहू नये.
कोरोनाची लस तयार करण्यासाठी इतर देशांसह भारतातील सरकारही सक्रिय झाले आहे. देशातील २ ते ३ लसींच्या चाचण्या सुरु आहेत. याव्यतिरिक्त एकूण मिळून पाच कंपन्यांचे कोरोनाचे उपचार शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमेरिका, ब्रिटेन, युरोपियन युनियन यांप्रमाणे भारतानंही लस निर्मीती करत असलेल्या काही कंपन्याशी करार केला आहे. सोमवारी कोरोनाच्या लसीच्या विकासासाठी काम पाहत असलेल्या तज्ज्ञांच्या गटाची दिग्गज फार्मा कंपन्यांच्या प्रमुखांनी भेट घेतली. या बैठकीदरम्यान ५ कंपन्यांना रोडमॅप तयार करण्यास सांगण्यात आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातील देशांनी कोरोना व्हायरसच्या लसीसाठी वाट पाहू नये. WHO च्या पश्चिमी देशातील रिजनल डायरेक्टर ताकेशी कासई यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वच देशांनी कोविड १९ शी लढण्यासाठी तयार असायला हवं. कोरोनाच्या लसीवर अवलंबून राहू नका. सुरूवातीला जास्त मागणी असल्यामुळे सगळ्या देशात लस उपलब्ध होऊ शकणार नाही.
सीएनएननं दिलेल्या वृत्तानुसार ताकेशी यांनी सांगितले की, जोपर्यंत कोरोनापासून सगळ्या देशांचा बचाव होत नाही. तोपर्यंत कोणताही देश सुरक्षित नाही. त्यासाठी कोरोनाशी लढण्यासाठी तयारी ठेवणं आवश्यक आहे. फक्त लसीवर अवलंबून राहिल्यानं कोरोना कमी होणार नाही. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी बैठकीनंतर एका तज्ज्ञांच्या गटाशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की तज्ज्ञ कोरोनाची लस तयार करण्याच्या दिशेनं काम करत आहेत. त्यासाठी उत्पादन, वितरण आणि किमतीवर चर्चा सुरू आहेत.
दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार २० ते ५० वर्ष वयोगटातील लोकांनी जीवघेणा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरवला आहे. पश्चिमी देशातील कोरोना संक्रमणाबाबत बोलातना WHO चे रीजनल डायरेक्टर डॉ. ताकेशी कासाई यांनी सांगितले की, २०, ३०, आणि ४० या वयोगटातील लोकांमार्फत कोरोना वेगानं पसरलं आहे. यातील जास्तीत जास्त लोकांना ते कोरोना संक्रमित असल्याची कल्पनासुद्धा नाही.डॉ. तकेशी कासाई यांनी सांगितले की, २० ते ५० या वयोगटातील लोकांकडून कोरोनाचं संक्रमण पसरलं जात आहे. दीर्घकाळ आजारी असलेले लोक, वृद्ध व्यक्ती, गर्दीची ठिकाणं आणि अंडर-रिजर्व्ड एरियामध्ये लोकांसाठी व्हायरस धोकादायक ठरू शकतो.
WHO च्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया, फिलिपींस आणि जपान या देशांमध्ये ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेले जास्तीत जास्त लोक संक्रमित झाले आहेत. या लोकांमध्ये व्हायरसची लक्षणं दिसून येत आहेत. तर काहींमध्ये लक्षणं नसतानाही कोरोनाचं संक्रमण झालं आहे. त्यातून नकळतपणे एकमेकांपर्यंत संक्रमण पोहोचत आहे.
हे पण वाचा-
पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे पसरताहेत जीवघेणे आजार; संसर्ग होण्याआधी स्वतःला 'असं' ठेवा सुरक्षित
'या' चुकांमुळे घराघरांत शौचालयाच्या माध्यमातून आजार पसरतात; वेळीच सावध व्हा
दूधासह दुग्धजन्य पदार्थ जास्तवेळ टिकवून ठेवण्यासाठी 'ही' टेक्निक माहीत करून घ्या