Coronavirus: मोठी बातमी! कोरोना दहशतीचं सावट दूर होणार?; WHO ची दिलासादायक भविष्यवाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 09:37 AM2022-02-22T09:37:09+5:302022-02-22T09:38:05+5:30
ओमायक्रॉन जगभरात पसरल्यानंतर आता हळूहळू कोरोनाची तीव्रता कमी होतेय असं WHO नं सांगितले.
मॉस्को – गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीनं(Corona Pandemic) जगातील अनेक देशांसमोर मोठं संकट उभं केले आहे. कोरोनाच्या विविध व्हेरिएंटमुळे लोकांना अद्यापही निर्बंधांमध्ये जगावं लागतंय. डेल्टा, ओमायक्रॉनसारख्या व्हेरिएंटमुळे अनेकांना चिंतेत टाकलं. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय आहे. बहुतांश देशांनी कोरोना लसीच्या २ डोससोबत बूस्टर डोसही लोकांना दिले आहेत. परंतु आजही कोरोनाचा धोका कायम आहे.
त्यातच लोकांना दिलासा देणारी बातमी जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. रशियातील WHO च्या प्रतिनिधीनं म्हटलंय की, जर ओमायक्रॉन(Omicron) नंतर कोविड १९ ची मोठी लाट आली नाही तर २०२२ च्या अखेरपर्यंत या महामारीचा अंत होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की व्हायरस पूर्णपणे संपुष्टात येईल. सध्या कुठलीही भविष्यवाणी करणं कठीण आहे. परंतु जर काही गंभीर घडलं नाही तर महामारी २०२२ मध्ये संपू शकते. महामारीचा अंत याचा अर्थ मोठं संकट येणार नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच व्हायरस म्यूटेशन करण्यात सक्षम असल्यानं मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढते. त्यामुळे पुढील स्थिती काय असेल सांगता येत नाही. ओमायक्रॉन जगभरात पसरल्यानंतर आता हळूहळू कोरोनाची तीव्रता कमी होतेय असं WHO नं सांगितले. वुजनोविकच्या म्हणण्यानुसार, हे केव्हा होईल हे WHO सांगण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु हे अवघड आहे, कारण अनेक देश आता त्यांची चाचणी धोरण बदलत आहेत.
अनेक देशांनी निर्बंध हटवले
ते म्हणाले की, ओमायक्रॉन स्ट्रेन खूप संसर्गजन्य आणि वेगाने पसरत होता. तर काही देशांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या पाहता प्रत्येकाची चाचणी घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. जेव्हा महामारी सुरू झाली आणि डेल्टा स्ट्रेनचा प्रसार सुरू झाला त्या वेळी आम्ही जे चित्र पाहत आहोत ते खरी आकडेवारी नव्हती. अनेक देशांत ओमायक्रॉनच्या लाटेनंतर कोविडच्या वाढत्या रुग्णसंख्येत घट पाहायला मिळाली. रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे निर्बंधही हटवण्यात आले आहेत.
काळजी घेण्याचं आवाहन
स्वीडन, डेन्मार्क आणि नॉर्वे या सर्वांनी कोविड निर्बंध उठवले आहेत कारण ते व्हायरसला समाजाला धोका नसलेला आजार म्हणून पुन्हा वर्गीकृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. यूके आणि यूएसही लवकरच फॉलो करण्याची शक्यता आहे. WHO सह अनेक तज्ञांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी अलीकडेच म्हटले आहे की, कोणत्याही देशाने शरणागती पत्करणे किंवा विजय घोषित करणे खूप घाईचं ठरणार आहे.