Coronavirus: कोरोनाकाळात वाढला विसरभोळेपणा, दिसताहेत अशी लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2022 07:26 AM2022-02-05T07:26:25+5:302022-02-05T07:29:59+5:30
Coronavirus: फोनचा क्रमांक, तारीख, कोणती संख्या किंवा नाव तुमच्या लक्षात राहत नसेल तर ही तक्रार तुमच्या एकट्याची नाही. कोरोना महामारी आल्यापासून गेल्या २ वर्षांत सगळ्यांची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे.
नवी दिल्ली : फोनचा क्रमांक, तारीख, कोणती संख्या किंवा नाव तुमच्या लक्षात राहत नसेल तर ही तक्रार तुमच्या एकट्याची नाही. कोरोना महामारी आल्यापासून गेल्या २ वर्षांत सगळ्यांची स्मरणशक्ती कमकुवत झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे असे की, यामुळे लोकांत लक्ष केंद्रित न करता येणे आणि माहितीचा विसर पडण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ केंटमधील सायकोलॉजीचे वरिष्ठ लेक्चरर आमिर हुमायू जवादी म्हटले की, “मानवात परिस्थितीशी जुळवून घेण्याची सवय असते. दोन वर्षांपासून लोकांनी जीवनात जास्त काही योजना केल्या नाहीत. त्यांना त्या गोष्टी न करण्याची सवय झाली आहे. यामुळे स्मरणशक्ती व लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे.” युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील न्यूरो बायोलॉजीचे प्रोफेसर माइकल यास्सा म्हणतात की, महामारीच्या काळात आयुष्यात लक्षात ठेवावे, असे काही विशेष घडत नसल्याने काही लक्षात न ठेवण्याची सवय झाली आहे.”
ज्या लोकांना कोरोनाची बाधा झाली नाही, त्यांना प्रत्येक दिवस एकसारखा असणे, लोकांशी न भेटणे आणि व्यायामाच्या अभावामुळे ब्रेन फॉग होणे सुरू झाले आहे”. ब्रेन फॉग म्हणजे अशी अवस्था की, ज्यामुळे व्यक्तीच्या व्यवहारात वेगाने बदल होणे. अशा लोकांमध्ये नेहमी थकवा, चिडचिड, नैराश्य, डोकेदुखी, कोणत्याही कामात लक्ष वा मन न लागणे, झोप न येणे आणि छोट्या-छोट्या गोष्टींचा विसर पडणे, अशा तक्रारी बघायला मिळतात. - आमिर हुमायू जवादी, वरिष्ठ लेक्चरर, युनिव्हर्सिटी ऑफ केंट, इंग्लंड
मेंदूला कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही मेंदूला जेवढा व्यायाम द्याल तेवढी तुमची स्मरणशक्ती बळकट होईल.
स्मरणशक्तीसाठी हे करा
n वेळेवर झोप पूर्ण करा
n रोज कमीत कमी २० मिनिटे व्यायाम करा
n पौष्टिक आहार घ्या
n लोकांशी बोलत राहा
n रोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा
n तणावाला ध्यानाद्वारे कमी करा