CoronaVirus : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १ रुग्ण ९० टक्के लोकांना करतोय संक्रमित, एम्स तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 04:04 PM2021-04-12T16:04:47+5:302021-04-12T16:15:46+5:30
CoronaVirus News & Latest Updates : एक रुग्ण मागच्या वर्षीच्या तुलनेत आता जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करत आहे.
कोरोनाच्या माहामारीत आधीच्या स्ट्रेनच्या तुलनेत आता नव्या स्ट्रेनच्या संक्रमणाचा वेग जास्त आहे. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानचे(AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी दिल्लीत कोरोना संक्रमण वेगानं पसरण्यामागे नवीन स्ट्रेन कारणीभूत ठरत आहे. टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एक रुग्ण मागच्या वर्षीच्या तुलनेत आता जास्तीत जास्त लोकांना संक्रमित करत आहे.
पहिल्यांदा संक्रमित व्यक्ती त्याच्या संपर्कात येत असलेल्या ३० ते ४० लोकांना संक्रमित करत होती. तर आता हे प्रमाण ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. म्हणजेच आधी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर शंभरातील ६० चे ७० लोक संक्रमित होत नव्हते. तर आता फक्त १० ते २० लोक व्हायरसच्या संक्रमणापासून वाचू शकतात. अनेक घरांमध्ये संपूर्ण कुटुंबातील लोकांना कोरोनाचं संक्रमण झालं आहे.
हे ३ वेरिएंट खूपच धोकादायक
कोरोना व्हायरसचे ब्रिटन, दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनप्रमाणे जगभरातील इतर देशात स्ट्रेन तयार झाले आहेत. पंजाबमध्ये जास्तीत जास्त लोक युकेच्या वेरिएंटने प्रभावित आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार हा नवा वेरिएंट दिल्लीत पसरत असल्यामुळे हाहाकार पसरला आहे.
जास्त घाम येणं ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण; जाणून घ्या लक्षणं अन् वेळीच व्हा सावध!
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया हे कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नॅशनल टास्क फोर्स फॉर कोविड -१९ मॅनेजमेंटचे सदस्य आहेत. ते म्हणाले की,'' दिल्लीत कोरोनाचा झपाट्याने प्रसार होण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे मास्क न घालणे, दोन मीटरचं अंतर न पाळणे, वेळोवेळी हात न धुणे. लोक वारंवार या साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे.''
गुलेरिया पुढे म्हणाले, "पहिल्या लाटेत आताच्या तुलनेत खूपच कमी रुग्णसंख्या होती. लोक कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना करीत होते, गर्दी कमी जमा व्हायची. आता लोक अधिक निश्चिंत झाले आहेत. संसर्ग टाळण्याबाबत फारच सावध नाही "म्हणूनच रोज कोरोनाची प्रकरणं इतकी वाढत आहेत की रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. गंभीर रुग्णांना दिल्लीत आयसीयू बेड मिळणं कठीण झालंय.''
'' यावर उपाय म्हणून कोविड स्पेशल बेड रूग्णालयात वाढवावे लागतील आणि लक्षणे असलेल्या कोरोना रूग्णांना दूर ठेवण्यासाठी काही हॉटेल हॉस्पिटलशी जोडले जावे लागतील. आम्हाला कोविड केअर सेंटरची संख्याही वाढवावी लागेल. हे सर्व गेल्या वर्षी करण्यात आले होते. यावेळी आपल्याकडे फारच कमी वेळ आहे. परिस्थिती आणखी खराब होऊ नये म्हणून आम्हाला खूप वेगवान पावले उचलण्याची गरज आहे." असेही गुलेरिया यावेळी म्हणाले.