Coronavirus: कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर भारतात मास्कमुक्ती होणं शक्य आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 06:43 AM2021-05-22T06:43:43+5:302021-05-22T06:44:04+5:30
अमेरिकेत लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी बहुतांश लोकांना पुन्हा कोरोना झाला नाही.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने अलीकडेच ज्या अमेरिकी नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना मास्क लावण्याचे बंधन नाही, असे जाहीर केले. त्यावर तिकडे बरीच उलटसुलट चर्चा झाली. परत मास्कचे बंधनही आले. मात्र भारतात मास्कमुक्ती होणे शक्य आहे का, अशी चर्चा आपल्याकडे सुरू झाली आहे. पाहुया मास्कमुक्ती अशक्य आहे की सध्या अशक्य आहे....
लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण
उपलब्ध डेटावरून असे स्पष्ट होते की, अमेरिकेत लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी बहुतांश लोकांना पुन्हा कोरोना झाला नाही. भारतात मात्र अशी परिस्थिती नाही. लसीकरण होऊनही अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत.
कोणत्या देशांमध्ये सध्या नाही मास्कची सक्ती?
इस्रायलने डोस पूर्ण झालेल्या ७० टक्के लोकांना मास्कची सक्ती नसल्याचे जाहीर केले आहे.
चीनध्येही अनेक ठिकाणी मास्कची सक्ती आता उरलेली नाही.
भूताननेही लढा जिंकला असून, त्यांनी ९० टक्के लसीकरण पूर्ण केले.
न्यूझीलंडने कोरोनाला आधीच परतवले आहे. त्यामुळे हा देश मास्कमुक्त आहे.
मास्कमुक्तीचा संदेश चुकीचा ठरणार
भारतात मास्कमुक्तीचा संदेश देणे चुकीचे ठरेल, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे. लस न घेणारेही मास्क न घालता फिरतील, अशी भीती आहे.
शिवाय लोकसंख्येचाही प्रश्न येतोच. त्यामुळेच लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या तरी भारतीयांना सध्या मास्कमुक्ती मिळणे अशक्यच आहे.