Coronavirus: खोकला अन् आवाजात होतोय बदल; जाणून घ्या, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 01:44 PM2023-01-21T13:44:05+5:302023-01-21T13:44:43+5:30
XXB.1.5 हे कोरोनाव्हायरसचा सब व्हेरिएंट आहे आणि अमेरिकेत पसरलेल्या कोरोनाच्या ४० टक्के रुग्णवाढीसाठी तो कारणीभूत आहे.
नवी दिल्ली - जगभरातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत, कोरोनाचे नवा XBB.1.5 व्हेरिएंट अधिक चिंतेचे कारण बनला आहे. लसीकरण झालेले लोकही त्याच्या विळख्यात येत आहेत. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, यूएसमध्ये कोविड १९ च्या ४० टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन XBB.1.5 व्हेरिएंटचे लक्षण आढळले आहे.
भारतीय SARS-CoV-2 Consortium on Genomics (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी जबाबदार असलेला हा व्हेरिएंट भारतात पसरत आहे. गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या शहरांमध्ये या व्हेरिएंटचे सुमारे २६ रुग्ण आढळले आहेत असं INSACOG च्या डेटा सांगतो. एपिडेमियोलॉजिस्ट एरिक फीगेल-डिंग यांनी ट्विटरवर सांगितले की, हा नवीन व्हेरिएंट बीक्यू आणि एक्सबीबीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे प्रतिकारशक्तीचा सामना करू शकतो. अनेक मॉडेल्स दाखवतात की XBB 1.5 व्हेरियंट मागील व्हेरियंटपेक्षा ट्रान्समिशन आणि इन्फेक्शन रेटच्या दृष्टीने जास्त धोकादायक आहे. त्याच वेळी, भारतात त्याचे अनेक प्रकरणे समोर आल्यानंतर चिंता वाढली आहे.
XXB.1.5 व्हेरिएंट काय आहे?
XXB.1.5 हे कोरोनाव्हायरसचा सब व्हेरिएंट आहे आणि अमेरिकेत पसरलेल्या कोरोनाच्या ४० टक्के रुग्णवाढीसाठी तो कारणीभूत आहे. बऱ्याच संशोधनांमध्ये, असे आढळून आले आहे की, XXB.1.5 पूर्वीच्या व्हेरिएंटपेक्षा जास्त वेगाने संक्रमण पसरवतो. सोप्या शब्दात, XBB आणि XBB.1.5 दोन्ही BA.2 चे रीकॉम्बिनंट (दोन भिन्न रूपांच्या जनुकांचा समावेश असलेला विषाणू) आहेत. XXB हे सर्व ओमायक्रॉन सब व्हेरिएंटसारखे आहे जे लोकांना वेगाने संक्रमित करतात असं व्हायरोलॉजिस्ट जी कांग यांनी म्हटलं.
XBB.1.5 व्हेरिएंटची लक्षणे काय?
अमेरिकेत कहर करणाऱ्या कोरोनाच्या XXB.1.5 व्हेरियंट हे रीकॉम्बिनेशन व्हेरियंट आहे जे जुन्या XBB पेक्षा खूप वेगवान आहे. नाक वाहणे, घसा खवखवणे, ताप, डोकेदुखी, शिंका येणे, थंडी वाजून येणे, खोकला आणि कर्कश आवाज येणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.
XXB.1.5 इतर व्हेरिएंटपेक्षा वेगळा कसा?
आरोग्य तज्ञ म्हणाले की, असे काही घटक आहेत जे XBB15 ला इतर Omicron व्हेरिएंटपेक्षा वेगळे करतात. यातील पहिला घटक म्हणजे तो आतापर्यंत समोर आलेल्या व्हेरिएंटपेक्षा अधिक जलद आणि आक्रमकपणे प्रतिकारशक्तीसोबत लढू शकतो. हे मानवी पेशींमध्ये सहजपणे प्रवेश करू शकतात हे जुन्या XBB किंवा BQ पेक्षा खूप वेगाने पसरते. ज्याठिकाणी या व्हेरिएंटचा प्रभाव असेल तिथे रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागते. जुन्या व्हेरिएंट आणि ओमायक्रॉनवर प्रभावी असलेल्या लसी या व्हेरिएंटलाही मात देऊ शकतात का याबद्दल शंका आहे.