Coronavirus: कोरोनाची साथ दोन वर्षांच्या आत संपण्याची शक्यता; जागतिक आरोग्य संघटनेला आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 03:04 AM2020-08-23T03:04:38+5:302020-08-23T07:37:10+5:30
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनोम घेब्रिसिस म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत.
जिनिव्हा : कोरोनाची साथ येत्या दोन वर्षांच्या आत संपुष्टात येईल, अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनोम घेब्रिसिस यांनी व्यक्त केली आहे. १९१८ साली आलेली स्पॅनिश फ्लूची साथदेखील दोन वर्षांत ओसरली, याची त्यांनी आवर्जून आठवण करून दिली.
घेब्रिसिस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, कोणत्याही साथीचा मुकाबला करण्यासाठी आता जगाकडे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. सध्या जग खूप जवळ आले आहे, तसेच एका ठिकाणाहून लोक खूप कमी वेळेत दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतात. प्रवासाची साधनेही जलद झाली आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलावही तितक्याच जलद गतीने होत आहे. मात्र, या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रगत उपाय आपल्याकडे आहेत. त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड आहे. कोरोनाच्या आजाराबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ विविध प्रकारचे प्रयोग करीत आहेत.
अधनोम घेब्रिसिस यांनी सांगितले की, जागतिकीकरणामुळे जग जवळ आले, त्याचे काही तोटे, तर काही फायदे झाले आहेत. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान फारसे प्रगत नव्हते. १९१८ साली आलेली स्पॅनिश फ्लूची साथ दोन वर्षांतच पूर्णपणे ओसरली होती. कोरोनाची साथही दोन वर्षांच्या आत संपण्याची शक्यता आहे.
नियमांचे काटेकोर पालन करा
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनोम घेब्रिसिस म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या हातात असलेल्या साधनांचा वापर करून कोरोना साथीवर नियंत्रण मिळविले पाहिजे. त्या साधनांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचाही समावेश होतो. एकट्या कोरोना लसीमुळेच ही साथ संपुष्टात येईल, या भ्रमात कोणीही राहू नये. लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळायला हवे व मास्क घालायला हवा. या नियमांचे काटेकोर पालन केले, तरच ही साथ नियंत्रणात येईल.