Coronavirus: कोरोनाच्या हल्ल्यामुळे कमकुवत झालेली फुप्फुसे बरी होण्यास लागतो एवढा काळ, संशोधनातून समोर आली दिलासादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 03:57 PM2021-07-19T15:57:30+5:302021-07-19T15:59:00+5:30
Coronavirus News: कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात प्रवेश करणारा कोरोना विषाणू हा सर्वात मोठा हल्ला करतो तो रुग्णाच्या फुप्फुसांवर. फुप्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यास श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊन रुग्ण मृत्यूच्या दारात पोहोचतो.
नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर शरीरात प्रवेश करणारा कोरोना विषाणू हा सर्वात मोठा हल्ला करतो तो रुग्णाच्या फुप्फुसांवर. फुप्फुसांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्यास श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊन रुग्ण मृत्यूच्या दारात पोहोचतो. (Coronavirus) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान, अनेक कोरोनाबाधित रुग्णांची फुप्फुसे ही ९० टक्क्यांपर्यंत खराब झाल्याचे दिसून आले होते. अशा परिस्थितीत कोरोनाबाधित फुप्फुसांमध्ये लंग्स फायब्रोसिस नावाचा आजार फैलावू शकतो अशी भीती डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे. अशा आजारामध्ये फुप्फुसांमधील टिश्शू खराब होऊन फुप्फुसे काम करणे बंद करतात. मात्र कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ज्या रुग्णांची फुप्फुसे खराब झाली होती, ती तीन महिन्यांमध्ये बरी होत असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. (Lungs weakened by the corona virus attack heal in three months )
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाचे पल्मोनोलॉजिस्ट डॉ. सुमित सिंघानिया यांनी सांगितले की, अभ्यासामधून समोर आले आहे की, बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांची फुप्फुसे ही आता बरी होत आहेत. या अभ्यासाचे प्राथमिक निष्कर्ष हे लंग्स इंडिजा जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
डॉ. सुमित सिंघानिया यांनी सांगितले की, ज्या कोरोनाबाधित रुग्णांची फुप्फुसे खूपच खराब झाली होती, अशा रुग्णांचे निरीक्षण करून या संशोधनामधील निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तीन महिन्यांनंतर बहुतांश रुग्णांच्या फुप्फुसांचे आकार आणि काम करण्याची पद्धत खूप सुधारली आहे. सर्व रुग्णांचे लंग्स फंक्शन टेस्ट आणि सीटीस्कॅन करण्यात आले आहेत.
हे संशोधन कोरोनाच्या त्या ४२ रुग्णांवर करण्यात आले आहे. ज्यांना अँटिव्हायरल रेमडेसिविर इंजेक्शन आणि स्टेरॉइड देण्यात आले होते. या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्यांना धोकादायक पातळीवरचा निमोनिया झाला होता. आतापर्यंत या संशोधनांतर्गत ३०० जणांवर लक्ष ठेवण्यात आला आहे. काही लोकांचे कोरोना झाल्यानंतर एक वर्षानंतरही फॉलो करण्यात आले आहे. तर दुसरीकडे हिंदुजा रुग्णालयाशी संबंधित एका डॉक्टरांनी सांगितले की, कोरोनामधून बरे झाल्यानंतर रुग्णांना लंग्स फायब्रोसिसचे औषधही घेण्यास सांगण्यात आले आहे.