चिंता वाढली! टॉयलेटसीट सुद्धा ठरू शकते कोरोना संसर्गाचं कारणं; जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:01 PM2020-06-21T12:01:39+5:302020-06-21T12:12:44+5:30
या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी फर्नीचर, शिड्या, वॉश बेसिन, टॉयलेटची स्वच्छता करणं गरजेचं आहे.
कोरोना व्हायरसचं संक्रमण संपूर्ण जगभरात वेगाने पसरत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जगभराला कोरोनाच्या माहामारीमुळे भयंकर परिणामांचा सामना करावा लागला आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाबाबत वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. कोरोना काळात लोकांच्या मनात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाची लागण होण्यापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टेंसिचं मोठ्या प्रमाणात पालन केलं जात आहे. या जीवघेण्या व्हायरसपासून बचावासाठी फर्नीचर, शिड्या, वॉश बेसिन, टॉयलेटची स्वच्छता करणं गरजेचं आहे.
चीनमधील यंग्जहो विद्यापिठातील संशोधकांनी एका अध्ययनातून दावा केला आहे की, संक्रमित व्यक्तीच्या टॉयलेट वापराने संपूर्ण परिसरात संक्रमण पसरू शकतं. तसंच टॉयलेटच्या वापरानंतर टॉयलेट सीटचं झाकण बंद केल्यास कोरोना संक्रमणाचा धोका कमी होऊ शकतो. तज्ज्ञांनी कोरोनाचं संक्रमण झालेल्या रुग्णांच्या मलाद्वारे व्हायरस पसरण्याचा धोका किती प्रमाणात असतो याबाबत अध्ययन केले होते. एका संशोधनातून दिसून आलं की, रुग्ण बरे झाल्यानंतर व्हायरस मलात पाच आठवड्यापर्यंत जीवंत राहू शकतो. म्हणून रुग्णांनी फ्लश करताना सावधगिरी बाळगली तर इतरत्र व्हायरस पसरण्याचा धोका कमी होऊ शकतो.
या संशोधनात तज्ज्ञांना दिसून आलं की, फ्लश केल्यानंतर संक्रमित कण पाण्याच्या वेगाने १ मीटर उंचावर पोहोचू शकतात. मलात असलेले व्हायरसचे कण साठ टक्क्यांपर्यंत हवेत पोहोचू शकतात. जर तुम्ही टॉयलेटचं झाकण बंद केले तर हा धोका टळू शकतो. जर्नल 'फिजिक्स ऑफ फ्लड' मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या माहितीनुसार टॉयलेट सीटमधून बाहेर आलेले व्हायरसचे कण वॉशरूमच्या वातावरणात १ मिनिटापेक्षा जास्त वेळ हवेत राहतात. या कणांच्या संपर्कात आल्यामुळे व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते.
सार्वजनिक ठिकाणांमध्ये कोरोनाचं संक्रमण पसरण्याचा धोका जास्त असतो. या संशोधनाचे प्रमुख जी जियांह वांग यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक वापरात असलेल्या टॉयलेट्समध्ये व्हायरस पसरण्याचा धोका जास्त असतो. म्हणून शौचालयाचा वापर करताना सावधगिरी बाळगायला हवी. शक्यतो वापरानंतर टॉयलेट सीट बंद करणं आणि फ्लश सुरू करतानाही टॉयलेट सीट बंद करणं हा यावरचा उपाय असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
CoronaVirus News : आता N95 मास्क, पीपीई किट निर्जंतुक होणार; २० वेळा वापरता येणार