कोरोनाचा नवीन व्हेरिएंट 'NeoCov' भारतासाठी किती धोकादायक? जाणून घ्या सविस्तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 01:45 PM2022-01-29T13:45:20+5:302022-01-29T13:46:20+5:30
NeoCov Variant : जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे की, 'निओकोव्ह'च्या क्षमतेसाठी अधिक स्पष्टतेची आवश्यकता आहे.
नवी दिल्ली : चिनी शास्त्रज्ञांना दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) वटवाघुळांमध्ये (Bat) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) एक नवीन व्हेरिएंट 'निओकोव्ह' (NeoCov) आढळला आहे. या 'निओकोव्ह'मध्ये म्यूटेशनची क्षमता अधिक असल्याचा दावा चिनी शास्त्रज्ञांनी केला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) म्हटले आहे की, 'निओकोव्ह'च्या क्षमतेसाठी अधिक स्पष्टतेची आवश्यकता आहे. तर आयडीएफ अध्यक्षांनी दावा केला की, 'निओकोव्ह'पासून भारताला कोणताही धोका नाही.
'निओकोव्ह' का धोकादायक?
चीनच्या वुहान विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या मते, 'निओकोव्ह' सार्स-सीओवी-2 प्रमाणेच मानवी पेशींमध्ये प्रवेश करू शकतो. हा व्हायरस मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम कोरोना व्हायरसच्या (MERS-Cov) सर्वात जवळचा आहे.
प्राणघातक व्हेरिएंट म्हणून चेतावणी जारी
चीनमधील वुहान शहरात 2019 मधील शेवटच्या महिन्यांत पहिल्यांदा कोरोना व्हायरस आढळून आला होता. याठिकाणी आता कोरोना व्हायरसच्या आणखी एका परंतु सर्वात धोकादायक आणि प्राणघातक 'निओकोव्ह' व्हेरिएंटबद्दल चेतावणी जारी केली आहे. वुहानमधील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, हा एक नवीन व्हेरिएंट आहे, ज्यामध्ये संक्रमणाचा मृत्यू दर सर्वाधिक आहे.
सार्स-सीओवी-2 सारखा आहे 'निओकोव्ह'
'निओकोव्ह' व्हायरस अनेक वर्षांपूर्वी मध्य पूर्वेकडील देशांमध्ये सापडला होता आणि तो सार्स-सीओवी-2 सारखाच आहे, ज्यामुळे मानवांमध्ये कोरोना व्हायरस होतो. तर 'निओकोव्ह'चा शोध वटवाघळांमध्ये दक्षिण आफ्रिकेत लागला होता. दरम्यान, या नवीन व्हेरिएंटच्या कोरोना व्हायरसला आतापर्यंत फक्त प्राण्यांमध्ये पसरताना दिसून आले आहे.
'निओकोव्ह'मुळे धोका नसल्याचा दावा
इंटरनेशनल डायबिटीज फेडरेशनचे (आयडीएफ) अध्यक्ष डॉ. शशांक जोशी यांनी एक ट्विट केले आहे. 'निओकोव्ह' रहस्याचा पर्दाफाश : 1. निओकोव्ह हा MERS Cov शी जवळचा संबंध असलेला जुना व्हायरस आहे. हा DPP4 रिसेप्टर्सद्वारे पेशींमध्ये प्रवेश करतो. 2. नवीन काय आहे : 'निओकोव्ह' वटवाघुळांचे ACE2 रिसेप्टर्स वापरू शकते, परंतु हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा त्यात नवीन म्यूटेशन असेल. याशिवाय बाकी सर्व काही प्रचार आहे, असे ट्विट डॉ. शशांक जोशी यांनी करत एकप्रकारे या व्हायरसमुळे धोका नसल्याचे म्हटले आहे.
Neo Cov demystified
1 NeoCov is an old virus closely related to MERS Cov which enter cells via DPP4 receptors
2. What's new : Neo cov can use ace2 receptors of bats but they can't use human ace2 receptor unless a new mutation occurs
Everything else is hype 🙏— Dr. Shashank Joshi (@AskDrShashank) January 28, 2022
'निओकोव्ह'बद्दल अधिक अभ्यास करण्याची गरज
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, नुकताच दक्षिण आफ्रिकेत वटवाघळांमध्ये सापडलेला 'निओकोव्ह' कोरोना व्हायरस मानवांसाठी धोकादायक आहे का? या प्रश्नावर आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. तर रशियामधील व्हॉयरोलॉजी अँड बॉयोटेक्नॉलॉजी विभागाने गुरुवारी 'निओकोव्ह' संदर्भात एक निवेदन जारी केले. यात म्हटले आहे की, सध्या 'निओकोव्ह' मानवांमध्ये सक्रियपणे पसरण्यास सक्षम नाही. नवीन कोरोना व्हायरस मानवांमध्ये पसरतो की नाही, हा सध्या प्रश्न नाही. तर त्याच्या जोखीम आणि क्षमतांबद्दल अधिक अभ्यास आणि तपासणी करण्याचा आहे.