'त्या' औषधानं केली कमाल; ११४ वर्षांच्या आजोबांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:37 PM2020-06-28T15:37:22+5:302020-06-28T15:48:46+5:30
CoronaVirus Latest News Updates : यशस्वीरित्या कोरोनाला हरवून हे आजोबा घरी परतले आहेत.
कोरोना व्हायरसचा प्रसार जगभरात दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत चालला आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान कोरोनाच्या माहामारीत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. एका ११४ वर्षांच्या आजोंबानी कोरोनावर मात केली आहे. इथोपियातील ११४ वर्षीय पारंपारिक बौद्ध भिक्षू असलेल्या आजोबांना कोरोनाची लागण झाली होती. पण यशस्वीरित्या कोरोनाला हरवून हे आजोबा घरी परतले आहेत. त्यांच्या कुटुंबातील लोकांनी ही माहिती दिली आहे. या आजोबांचे नाव तिलाहुन वुल्डेमायकल (Tilahun Woldemichael) आहे. तीन आठवडे रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या आजोबांना घरी सोडण्यात आलं आहे.
कोरोना रुग्ण तिलाहुन वुल्डेमायकल यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना डेक्झामेथॅसोन हे औषध देण्यात आले. हे सहज उपलब्ध होणारे तसंच स्वस्त औषध आहे. या औषधाच्या वापराने इंग्लँडमधील मृतांची संख्या कमी झाली आहे. इथोपियाच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्रालयाने ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोविड 19 च्या रुग्णांना डेक्झामेथॅसोन देण्याचे आवाहन केले होते.
तिलाहुन यांचा नातू लियुसेगेड याने सांगितले की, ''आमच्याकडे आजोबांचे बर्थ सर्टीफिकेट नाही, पण आजोबांच्या १०० व्या वाढदिवसाचे फोटो आहेत. आजोबांना कोविड 19 साठी रुग्णालयात भरती करण्यात आलं तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. पण आता रुग्णालयातून आजोबा परत आल्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब आनंदी आहे. यानिमित्ताने आम्ही सगळे एकत्र आलो आहोत.'' माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार तिलाहुन १०० व्या वाढदिवसाच्या दिवशीही तरूण असल्याप्रमाणे दिसत होते.
दरम्यान जगभरात कोरोनाचा कहर अजूनही कमी झालेला नाही. कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी कोणतंही औषधं किंवा लस अद्याप तयार झालेली नाही. गंभीर आजारात वापरात असलेल्या औषधांचा वापर कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी केला जात आहे. त्यात रेमडिसीवीर, डेक्झामेथासोन, फॅबीफ्लू यांसारख्या इतर औषधांचा समावेश आहे. सध्या लस तयार करण्यासाठी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या लसीचे परिक्षण अंतीम टप्प्यात पोहोचले आहे. तर मॉर्डना आणि भारतातील सिरम इंडीया, सिपला या कंपन्याद्वारे परिक्षण सुरू आहे.
काळजी वाढली! लस निष्क्रीय ठरण्याचं कारण असू शकतं कोरोना विषाणूंचे बदलतं स्वरुप
पावसाळ्यात डेंग्यूमुळे ताप आलाय की कोरोना विषाणूंचं संक्रमण झालं आहे; कसं ओळखाल?