CoronaVirus News : एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास कोरोना होऊ शकतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 01:31 AM2020-05-23T01:31:45+5:302020-05-23T01:32:09+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates :बॉस्टन येथे ९ माकडांवर केलेल्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या माकडांचा बरे झल्यावर ३५ दिवसांनी परत कोरोना विषाणूशी संपर्क आला.
परदेशात काही कोरना रुग्णांना परत संपर्क आल्यावर कोरोनाचा संसर्ग झाला. पण हे प्रमाण खूप कमी होते. एकदा कोरोना झाल्यावर परत संपर्क आल्यास काय? याचे उत्तर संशोधक प्रयोग करून शोधत आहेत. बॉस्टन येथे ९ माकडांवर केलेल्या एका प्रयोगात सहभागी झालेल्या माकडांचा बरे झल्यावर ३५ दिवसांनी परत कोरोना विषाणूशी संपर्क आला. पण या नंतर या आधी एकदा संसर्ग झालेल्या या माकडांना दुसऱ्यांदा संपर्क आल्यावर काहींना अत्यंत सौम्य व काहींना कुठलीही लक्षणे दिसली नाहीत. त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती दर्शवणारे घटक म्हणजेच अँटीबॉडिज या मानव बरे झाल्यावर निर्माण होतात तेवढ्याच पातळीच्या होत्या. यावरून परत कोरोना झाल्यास शरीरात आधी इतकाच प्रतिकारशक्तीचा प्रतिसाद मिळू शकतो असे दिसून येते. पण या अभ्यासाच्या मर्यादा या आहेत, की हे प्राण्यांवरील संशोधन आहे. तसेच ही शरीरातील प्रतिकारशक्ती किती काळ टिकून राहते हे समजण्यासाठी अजून वाट पाहावी लागेल. तसेच मानवामध्ये काय होते हे सांगण्यास याचा आधार घेतला जाऊ शकतो पण मानवात काय घडते हे साथ पुढे सरकेल तसे स्पष्ट होईल. तसेच दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यास तो तीव्र नसेल असे मानले तरी एकदा कोरोना झालेल्या रुग्णाला सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात धुणे हे सर्व प्रतिबंधाचे नियम पाळायचेच आहेत. पण मात्र गोवर, कांजण्या या आजारांसारखे एकदा संसर्ग झाला की तो संसार्गच तुम्हाला आयुष्यभर कायमची प्रतिकारशक्ती बहाल करेल हे सांगता येणार नाही.
- अमोल अन्नदाते
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)