CoronaVirus : काळजी वाढली! मानवी त्वचेवर ९ तास जीवंत राहू शकतो कोरोना विषाणू; तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 01:00 PM2020-10-06T13:00:18+5:302020-10-06T13:03:17+5:30
CoronaVirus News & latest Updates : जर कोरोनाला अनुकूल वातावरण प्राप्त झाले तर मानवी त्वचेवर तब्बल ९ तास कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो.
कोरोना विषाणूने गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. आतापर्यंत या विषाणूंच्या प्रसाराबाबत नवनवीन गोष्टी संशोधनातून समोर आल्या आहेत. दरम्यान जपानच्या क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना बरेच तास माणसांच्या त्वचेवर टिकून राहू शकतो. जर कोरोनाला अनुकूल वातावरण प्राप्त झाले तर मानवी त्वचेवर तब्बल ९ तास कोरोना विषाणू जिवंत राहू शकतो.
या विद्यापीठातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक प्राणी व माणसांच्या त्वचेवर कोरोना कितीवेळ राहू शकतो यासंबंधी अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात असं दिसून आलं की, कोरोना इन्फ्लूएंझा-A व्हायरसपेक्षा जास्त काळ माणसांच्या त्वचेवर टिकू शकतो. तज्ज्ञांनी सांगितले की. वारंवार हात स्वच्छ करणं किती आवश्यक आहे हे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. सॅनिटायझर वापरण्यापेक्षा पाणी आणि साबणाने हात धुणे नेहमीच फायदेशीर ठरते.
क्लिनिकल इन्फेकशियस डिसीज जर्नलमध्ये हे संशोधनक प्रकाशित करण्यात आलं आहे. कोरोना विषाणू आणि इन्फ्लूएंझा-A विषाणूंवर लक्ष केंद्रीत करून हे संशोधन करण्यात आले होते. या संशोधनातून दिसून आले की, कोरोनाचा प्रसार त्वचेच्या माध्यमातून वेगाने होऊ शकतो. कारण जवळपास ९ तासांपर्यंत व्हायरस माणसाच्या त्वचेवर जीवंत राहतो.
दरवाज्याचं हॅंडल आणि बटन दाबल्यास कोरोनाचा प्रसार होत नाही
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला होता की, कोरोना महामारी पृष्ठभाग जसे की, दरवाजाच्या माध्यमातून पसरत नाही. या रिसर्चमध्ये सहभागी प्राध्यापिका मोनिका गांधी यांनी सांगितले की होते, कोरोना व्हायरस पसरण्याचा मुद्दा वास्तवात नष्ट झाला आहे. त्यांनी सांगितले की, पृष्ठभागावर पडलेल्या विषाणूंमध्ये अजिबात इतकी शक्ती नसते की, त्याने एखाद्या व्यक्तीला आजारी करावं.
theaustralian.com.au ने दिलेल्या वृत्तानुसार या रिसर्चमधून समोर आलं आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हात धुणे आणि चेहऱ्याला हात न लावणे यापेक्षाही फायदेशीर उपाय आहे सोशल डिस्टंसिंग आणि मास्क घालणे. मोनिका यांनी सांगितले होते की, याचा अर्थ असाही आहे की, संपूर्ण जगात पृष्ठभागावर बॅक्टेरिया नष्ट करणाऱ्या स्प्रेचा वापर अनावश्यक ठरू शकतो. कोरोना महामारी दरम्यान संपूर्ण जगात या स्प्रेचा वापर पृष्ठभागावर केला जात आहे.