CoronaVirus News : घरीच आयसोलेशनमध्ये असल्यास चुकूनही करू नका या गोष्टी; अन्यथा रिकव्हर होण्यास लागू शकतो वेळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 11:41 AM2021-04-20T11:41:51+5:302021-04-20T11:46:27+5:30
CoronaVirus News & Latest Updates : घरात आयसोलेशनमध्ये राहून 80 टक्के पेक्षा जास्त लोक बरे होत आहेत.
दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढताना दिसून येत आहे. कोरोना संक्रमितांची आणि रुग्णांची वाढती संख्या पाहता सर्वच देशातील शासकीय यंत्रणा लॉकडाऊनच्या दिशेनं पाऊलं उचलताना दिसून येत आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा ताण आल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत सौम्य कोरोनाची लक्षणं दिसत असल्यास बहुतेक स्वतःला होम आयसोलेशनमध्ये ठेवत आहेत. होम आयसोलेशनमध्ये असताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होत असतो.
घरात आयसोलेशनमध्ये राहून 80 टक्के पेक्षा जास्त लोक बरे होत आहेत. यावेळी, रुग्णांनी काही नियमांचे पालन केले पाहिजे जेणेकरुन रुग्ण लवकर रिकव्हर होईल आणि कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्गापासून वाचवता येईल. सफदरजंग हॉस्पिटलच्या मेडिसिन विभागाचे अध्यक्ष डॉ. जुगल किशोर म्हणतात की, '' घरात राहणा-या कोरोना-संक्रमित रुग्णाला आपल्या खोलीच्या खिडक्या खुल्या ठेवाव्यात जेणेकरून खोलीत हवा आणि सूर्यप्रकाश येऊ शकेल. घरी रूग्णांनी दोन ते तीन वेळा ताप तपासणी करावी. हे लक्षात ठेवा की ताप 100 डिग्री फॅरेनहाइटपेक्षा जास्त नसावा. त्याच वेळी, ऑक्सिमीटरच्या सहाय्याने रक्तातील ऑक्सिजनची पातळी देखील तपासून पहा. त्याची पातळी ९४ टक्क्यांपेक्षा कमी नसावी.''
घरीही रुग्णांनी मास्क वापरायला हवा. दर पाच ते सात तासांनी ते बदला. रूग्णांनी त्यांची भांडी, टॉवेल्स, कपडे आणि बेडशीट बाजूला ठेवाव्यात. घरातील कोणत्याही सदस्याने त्याचा वापर करु नये. त्याच वेळी, आपले हात साबणाने किमान 40 सेकंद चांगले धुवा किंवा सॅनिटायझरने स्वच्छ करा.कोरोना रूग्णांनी घरात आयसोलेशन दरम्यान नियमितपणे डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घ्यावीत. आपण इतर कोणत्याही आजारासाठी औषधे घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. या कालावधीत रुग्णानं मद्यपान आणि धूम्रपान करू नये. भरपूर झोप घ्या. शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
पॉझिटिव्ह आल्यापासून उपचारांपर्यंत; लवकर बरं होण्यासाठी कोरोनाबाबत या गोष्टी माहीत करून घ्या
रुग्ण त्यांच्या कुटुंबियांशी आणि जवळच्या नातेवाईकांशी मोबाईल व इतर ऑनलाइन माध्यमातून बोलत राहतात. यावेळी, रुग्ण शक्य तितक्या नकारात्मक बातम्यांपासून दूर असले पाहिजेत. घरी आयसोलेशनच्या वेळी ताप जास्त येत असल्यास, श्वास घेण्यात अडचण जाणवत असेल तर ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते. रुग्णाला अस्वस्थता, चिंता, तीव्र डोकेदुखी सारख्या समस्या असल्यास त्वरित रुग्णालयात जा. आपल्या इच्छेनुसार घरी उपचार करू नका.
समोर आली कोरोनाची ५ गंभीर लक्षणं; सामान्य समजून दुर्लक्ष करणं ठरु शकतं संसर्गाचं कारण
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी (20 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 2,59,170 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 1,761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,53,21,089 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,80,530 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 20,31,977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,31,08,582 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.