CoronaVirus News : कोरोनापासून वाचण्यास लसीपेक्षा मास्क उपयुक्त, अमेरिकी तज्ज्ञाचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:55 AM2020-09-18T03:55:17+5:302020-09-18T07:51:43+5:30
उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने प्रथमच १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनामुळे आणखी १,१३२ लोक मरण पावल्यामुळे बळींचा आकडा ८३,१९८ झाला आहे.
वॉशिंग्टन/नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वत:ला वाचविण्यासाठी प्रतिबंधक लसीपेक्षा मास्क हे अतिशय प्रभावी व उपयोगी साधन आहे, असे सेंटर आॅफ डिसिज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन या संस्थेचे संचालक रॉबर्ट रेडफील्ड यांनी म्हटले. दरम्यान, देशात गुरुवारी कोरोनाचे ९७,८९४ नवे रुग्ण आढळून आले असून, हा एका दिवसातील रुग्णसंख्येचा आजवरचा उच्चांक आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ५१ लाखांवर पोहोचली आहे, तर या संसर्गातून आतापर्यंत ४० लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत.
उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येने प्रथमच १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनामुळे आणखी १,१३२ लोक मरण पावल्यामुळे बळींचा आकडा ८३,१९८ झाला आहे. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५१,१८,२५३ असून, बरे झालेल्यांची संख्या ४०,२५,०७९ आहे, तसेच उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या १०,०९,९७६ आहे. कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येच्या तुलनेत उपचार सुरू असलेल्या रुग्णांचे प्रमाण १९.७३ टक्के आहे. या आजाराच्या रुग्णांचा मृत्यूदर १.६३ टक्के इतका कमी राखण्यात देशाला यश आले आहे.
दरम्यान, अमेरिकी सिनेटच्या उपसमितीच्या बैठकीत कोरोनासंदर्भात सिनेट सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते. रॉबर्ट रेडफील्ड यांनी सांगितले की, तोंडाला लावायचे मास्क हे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी लसीपेक्षाही अधिक उपयोगी ठरतील, असे आम्ही केलेल्या पाहणीतून आढळले आहे.
अमेरिकेत कोरोनाची प्रतिबंधक लस या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या प्रारंभी सर्वांसाठी उपलब्ध होईल, असे म्हटले जात असले तरी ती साथ निर्मूलनासाठी किती उपयोगी ठरेल, हे आताच कोणालाही सांगता येणार नाही. जलदगती प्रयोगातून तयार केलेली लस फारशी प्रभावी ठरणार नाही, असे काही शास्त्रज्ञांचे मत आहे.
त्या पार्श्वभूमीवर रॉबर्ट रेडफील्ड यांनी सांगितले की, कोरोना संसर्गावर लस उपलब्ध झाली तरी त्यानंतरही लोकांनी मास्क घातले पाहिजेत. त्यामुळे या साथीवर खूप लवकर नियंत्रण मिळविता येईल. लस बनविण्याचे प्रयोग यशस्वी झाले तरी पुढील वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस किंवा तिसºया तिमाहीच्या सुरुवातीपर्यंत ही लस सर्वांना उपलब्ध करून देता येईल. त्याच्या आधी हे काम होणे शक्य नाही.
ट्रम्प खोटा प्रचार करीत असल्याची टीका
कोरोना प्रतिबंधक लस येत्या नोव्हेंबर महिन्याच्या आधीच अमेरिकी जनतेला उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्या देशाचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार सांगत आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक असल्याने लसीबाबत ट्रम्प यांनी खोटा प्रचार चालविला असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाने केला आहे. अमेरिकेमध्ये सध्या काही लसींच्या मानवी चाचण्या सुरू आहेत. आॅक्सफर्ड व अॅस्ट्राझेनिसा यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित होणाºया, तसेच फायझर कंपनीकडून बनविल्या जाणाºया लसींच्या प्रयोगांवर अनेकांचे लक्ष लागले आहे.
जगात सर्वाधिक रुग्ण असलेल्या देशांत अमेरिका प्रथम क्रमांकावर - 68,00,000 हून अधिक रुग्ण अमेरिकेत आहेत. दुसऱ्या स्थानी असलेल्या भारतामध्ये अमेरिकेच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 17,00,000 ने कमी आहे, तर ब्राझीलमध्ये 44,00,000 हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. भारतामध्ये कोरोना रुग्णसंख्येने ४० लाखांचा टप्पा ५ सप्टेंबर व 50,00,000 चा टप्पा १६ सप्टेंबर रोजी ओलांडला.