आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन; संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली, तज्ज्ञांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 02:28 PM2020-12-21T14:28:52+5:302020-12-21T14:43:48+5:30
CoronaVirus News & Latest Updates : आयसीएमआर एपिडेमिओलॉजी विभागाचे संस्थापक-संचालक डॉ मोहन गुप्ते यांनी याबाबत माहिती दिली आहे.
ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा नव्या रूपातील कोरोनाच्या प्रसाराने कहर केला आहे. ब्रिटनमधील आरोग्य तज्ञांना पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढविण्यासाठी जबाबदार असलेल्या विषाणूचा नवीन स्ट्रेन सापडला आहे. नवीन स्ट्रेन पूर्वीच्या रूपांपेक्षा जास्त संसर्गजन्य आहे असे वैज्ञानिक म्हणणे आहे. याचा अर्थ असा आहे की नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवितो. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की लोकांना दिले जात असलेली कोरोनाची लस नवीन स्ट्रेनविरूद्ध लढण्यात देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि शरीरावर प्रभावी ठरेल. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार झाल्यामुळे ब्रिटन सरकारने नाताळच्या खरेदीसाठी तसंच सण साजरा करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत.
इंडिया टुडेशी बोलताना चेन्नई येथील आयसीएमआर एपिडेमिओलॉजी विभागाचे संस्थापक-संचालक डॉ मोहन गुप्ते यांनी याबाबत माहिती दिली आहे. यूकेमध्ये विषाणूचा प्रसार झपाट्याने झाल्यानंतर आता विषाणूचा नवीन स्ट्रेन सापडला. यामुळे साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी चालू असलेले प्रयत्न निरर्थक ठरतील का? असं त्यांना विचारल्यानंतर डॉ. गुप्ते म्हणाले की, ''20 सप्टेंबर रोजी दक्षिण इंग्लंडमध्ये व्हायरसचा नवीन स्ट्रेन सापडला.
त्याचवेळी संपूर्ण जगभरात झपाट्याने कोरोनचा प्रसार वाढायला सुरूवात झाली. व्हायरसच्या नवीन स्ट्रेनच्या जीनोमध्ये एकूण १७ बदल झालेले दिसून येत आहे. हा खूप मोठा बदल आहे. जो माणसांसाठी धोकादायक ठरू शकतो. यामुळेच संक्रमणाची तीव्रताही वाढत आहे. त्यामुळे व्हायरस ७० टक्क्यांनी अधिक क्षमतेने पसरू शकतो. ''
कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांना लसीची गरज भासणार नाही? तज्ज्ञांनी सांगितले की.....
पुढे त्यांनी सांगितले की, ''नवीन स्ट्रेन केवळ ब्रिटनमध्येच असावा अशी उच्च शक्यता आहे कारण तो व्हायरस युरोपच्या इतर भागात आढळलेला नाही. कोरोना विषाणू इन्फ्लूएन्झापेक्षा बराच स्थिर आहे. विषाणूचा एक नवीन स्ट्रेन नक्कीच भारतात येऊ शकतो कारण जागतिक स्तरावर संसर्गाचे प्रमाण खूप जास्त आहे.''
चिंताजनक! कोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या ताण-तणावात वाढ; तज्ज्ञांनी सांगितली 'ही' कारणं...
नव्या विषाणूचा भारतावर किती परिणाम झाला याचा तपास केला जाणार आहे. भारतातील सद्यस्थितीबद्दल भाष्य करताना गुप्ते म्हणाले की, भारतात कोरोनाच्या केसेसमध्ये लक्षणीय घट झाली आहे. भारतात रुग्णांची वाढ आणि संक्रमणाची तीव्रता यांचे प्रमाणही खूप कमी आहे.
ब्रिटनमध्ये आंतराराष्ट्रीय उड्डानं रोखली
अनेक देशात परदेशातील उड्डानांवर बंदी घालण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये व्हायरसच्या नवीन स्ट्रेनमुळे चिंताजनक वातावरण पसरलं आहे.ब्रिटनमध्ये फ्रांस, जर्मनी, इटली, नेदरलँड, ऑस्ट्रिया, आयलँड आणि बुल्गेरिया या प्रदेशांतील विमानांच्या उड्डानांवर बंदी घालण्यात आली आहे. सौदी अरेबियानेही कोरोनाच्या नवीन स्ट्रेनच्या भीतीमुळे सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे एका आठवड्यासाठी रद्द केली आहेत.
कोरोनाच्या नव्या रूपाची पूर्ण माहिती मिळेपर्यंत उड्डाण बंदी वाढविण्यात येऊ शकते असे सौदी अरेबियाच्या गृहमंत्र्यांनी सांगितले आहे. सौदी अरेबियाचे समुद्री बंदरंसुद्धा एक आठवडा बंद राहतील. सरकारने आदेश दिले आहेत की गेल्या तीन महिन्यांत जर कोणी युरोपियन देशात गेले असेल तर कोविड चाचणी त्वरित करा.