coronavirus: रेकॉर्डब्रेक, भारतात २४ तासांत तब्बल एक लाख रुग्ण कोरोनामुक्त, नव्या बाधितांच्या संख्येतही मोठी घट
By बाळकृष्ण परब | Published: September 22, 2020 11:14 AM2020-09-22T11:14:30+5:302020-09-22T11:19:54+5:30
देशात सुरू असलेला कोरोना विषाणूच्या फैलावाचा जोर आता ओसरत असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नवी दिल्ली - गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण देशात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या फैलावाचा जोर आता ओसरत असल्याचे दिसू लागले आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशभरात तब्बल एक लाख रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. तर कालच्या दिवसभरात नव्या रुग्णांच्या संख्येतही मोठी घट दिसून आली आहे. काल दिवसभरात देशामध्ये कोरोनाचे ७५ हजार ०८३ नवे रुग्ण सापडले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल देशभरामध्ये कोरोनाचे ७५ हजार ०८३ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख, ६२ हजार ६६३ एवढी झाली आहे. तर या २४ तासांत एक हजार ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ८८ हजार ९३५ एवढा झाला आहे.
Single-day spike of 75,083 new infections, 1,053 fatalities push India's #COVID19 tally to 55,62,663, death toll to 88,935: Union Health Ministry.
— Press Trust of India (@PTI_News) September 22, 2020
मात्र या सर्वामध्ये सर्वात दिलासादायक बाब म्हणजे भारतामध्ये काल दिवसभरात तब्बल एक लाख एक हजार ४६८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ९७ हजार ८६७ एवढी झाली आहे. तर देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या घटून ९ लाख ७५ हजार ८६१ एवढी झाली आहे.
Number of active COVID-19 cases in India stands at 9,75,861, while 44,97,867 people have recovered so far: Union Health ministry
— Press Trust of India (@PTI_News) September 22, 2020
देशात आतापर्यंत कोरोनाच्या संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ८०.१२ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १.६० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित १८.२८ टक्के रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार २१ सप्टेंबरपर्यंत देशात सहा कोटी ५३ लाख, २५ हजार ७७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी ९ लाख ३३ हजार, १८५ नमुन्यांची चाचणी ही सोमवारी करण्यात आली.
महाराष्ट्रातही घटली नव्या कोरोनाबाधितांची संख्या
देशात कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या महाराष्ट्रामधूनही काल दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रात १५ हजार ७३८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ३२ हजार ७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. या २४ तासांत राज्यात ३४४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ३३ हजार १५ झाली आहे.