काळजी वाढली : कोरोना रुग्णांमध्ये 'या' आजाराचा धोका सातपट; अमेरिकेतील संशोधनातून माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 05:25 AM2021-07-11T05:25:30+5:302021-07-11T05:26:18+5:30
Bells Palsy : कोरोनाचा धोका कायम असतानाच बेल्स पाल्सी या आजाराचा धोका समोर आला आहे.
नवी दिल्ली : कोविड-१९ संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम असतानाच आता ‘बेल्स पाल्सी’ या आजाराचा धोका समोर आल्यामुळे लोकांमध्ये नवी भीती निर्माण झाली आहे.
जगातील कोविड-१९ बाधितांचा आकडा १८ कोटींच्या वर गेला आहे. लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. या विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील सरकारे शर्थीचे प्रयत्न करीत असतानाच काळी बुरसी (ब्लॅक फंगस) आणि डेल्टा प्लस यांचे संकट आले. त्यापाठोपाठ आता बेल्स पाल्सीचे रुग्ण आढळल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. ‘बेल्स पाल्सी’ म्हणजे चेहऱ्याचा अर्धांगवायू किंवा ‘लकवा’ होय. कोरोना रुग्णांमध्ये बेल्स पाल्सीचा धोका सातपट अधिक असल्याचे दिसून आले आहे.
माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, अमेरिकेच्या ओहियो प्रांतातील क्लेव्हलँड शहरातील केस वेस्टर्न रिझर्व्ह विद्यापीठात यासंबंधीचे संशोधन करण्यात आले. विद्यापीठातील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्स क्लेव्हलँड मेडिकल सेंटर आणि केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन या दोन संस्थांनी केलेल्या नव्या संशोधनात कोरोनाच्या १ लाख रुग्णांपैकी ८२ जणांना बेल्स पाल्सी विकार झाल्याचे संशोधनात आढळून आले आहे. कोरोना लस घेतलेल्या १ लाख लोकांपैकी फक्त २० जणांना हा त्रास झाला आहे.
काय आहे बेल्स पाल्सी?
बेल्स पाल्सी हा शरीरातल्या स्नायूंशी निगडित असलेला अर्धांगवायूसदृश विकार आहे. अर्धांगवायूमध्ये अर्धे शरीर निकामी होते. बेल्स पाल्सीमध्ये चेहऱ्याची एक बाजू लुळी होते. रुग्णाला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो. याचा डोळ्यांच्या पापण्यांवर आणि भुवयांवरही परिणाम होतो.
डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या राहतात. हा विकार होण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, उच्च रक्तदाब, मधुमेह तसेच काही गंभीर आजारांत बेल्स पाल्सीचा सर्वाधिक धोका असतो. संशोधकांच्या मते, हा त्रास उद्भवल्यावर दोन महिन्यांत यावर योग्य उपचार करण्यात आले, तर हा विकार बरा होऊ शकतो. यातून बाहेर येण्यासाठी ६ महिन्यांचा कालावधीही लागू शकतो.
डेल्टा व्हेरिएंटचा धोका
अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांच्या चिंता वाढविल्या आहेत. अनेक देशांमध्ये या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल १०० देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे.