Coronavirus Pregnancy: गर्भवती महिलेच्या गर्भाला कोरोना व्हायरसचा धोका असतो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 11:20 AM2020-03-17T11:20:19+5:302020-03-17T11:21:15+5:30
Coronavirus Pregnancy: अशातच एक प्रश्न विचारला जात आहे की, कोरोना व्हायरसने पीडित गर्भवती महिलेच्या गर्भातील बाळाला धोका आहे का? बाळालाही याची लागण होईल का?
Coronavirus Pregnancy: कोरोना व्हायरस (Coronavirus) भारतातही वेगाने पसरत आहे. तेवढ्याच वेगाने कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवाही पसरत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये आणखीनच भीती बघायला मिळत आहे. आता अशातच एक प्रश्न विचारला जात आहे की, कोरोना व्हायरसने पीडित गर्भवती महिलेच्या गर्भाला धोका आहे का? बाळालाही याची लागण होईल का? अशाप्रकारचे प्रश्न गर्भवती महिलांना पडत आहेत.
काय सांगतो रिसर्च?
याबाबत चीनच्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे. त्यांच्यानुसार कोरोना व्हायरसची लागण एखाद्या गर्भवती महिलेला झाली असेल तर त्या महिलेच्या गर्भाला काहीच धोका नाही. हा रिसर्च जर्नल फ्रंटियर्स इन पीडियाट्रिक्समध्ये प्रकाशित करण्यात आलाय.
यात दावा करण्यात आला आहे की, गर्भवती महिलेच्या गर्भाला याने काही नुकसान होणार नाही आणि गर्भाला कोरोना व्हायरसची लागणही होणार नाही. वैज्ञानिकांनी हा रिसर्च पीडित गर्भवती महिलांवर केला त्यानंतर निष्कर्ष दिले.
या रिसर्चदरम्यान अभ्यासकांनी कोरोना व्हायरसने संक्रमित ४ गर्भवती महिलांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं. जेव्हा या बाळांचा जन्म झाला तेव्हा आढळलं की, हे बाळ कोरोना व्हायरसने संक्रमित नाहीत. इतकेच नाही तर बाळांमध्ये ताप आणि खोकल्याची काही लक्षणेही आढळली नाही.
(Image Credit : thedailybeast.com)
या रिपोर्टनुसार, या चारपैकी एका बाळाला श्वास घेण्यास अडचण येत होती. पण त्यावर कोणतीही सर्जरी न करता उपचार करण्यात आले. तेच दुसरीकडे एका बाळाच्या शरीरावर रॅशेज आले होते, जे काही दिवसातच ठीक झाले. वैज्ञानिकांनी सांगितले की, ही लक्षणे कोरोना व्हायरसची लागण झाल्याची नाहीत.
चीनच्या वैज्ञानिकांनुसार, गर्भात वाढत असलेल्या बाळाला कोरोना व्हायरसचा धोका नसतो. त्यामुळे पुरेशी काळजी घ्या, पण कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. घराची स्वच्छता ठेवा आणि बाहेर जाणं टाळावे.