Coronavirus: जगातील पहिली कोरोना लस बनवली; रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 02:57 PM2020-08-11T14:57:06+5:302020-08-11T14:59:37+5:30
Coronavirus: रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. इतकचं नाही तर राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीनेही लस घेतली आहे.
जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं असताना आतापर्यंत १ कोटी ९० लाखाहून जास्त लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अनेक देशाचे संशोधक कोरोनावरील लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच रशियाचे(Russia) राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मंगळवारी रशियाने कोरोनावरील पहिली लस बनवल्याची घोषणा केली आहे. जगातील ही पहिली कोरोना लस आहे असा दावा त्यांनी केला आहे.
रशियाच्या आरोग्य मंत्रालयाकडूनही कोरोनावरील या लसीला मान्यता देण्यात आली आहे. इतकचं नाही तर राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीनेही लस घेतली आहे. माहितीनुसार ही लस मॉस्कोच्या गामेल्या इंस्टिट्यूटने विकसित केली आहे. मंगळवारी रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने ही लस यशस्वी ठरल्याचं मान्य केले आहे. त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांनी घोषित केलं आहे की, लवकरच रशिया या लसीच्या उत्पादनाचं काम सुरु करेल आणि मोठ्या संख्येने लसीचे डोस तयार करण्यावर त्यांचा भर असेल.
अलीकडेच व्लादिमीर पुतीन यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान मुलीला नवीन लस देण्यात आली. काही वेळानंतर तिच्या शरीराचं तापमान वाढलं पण आता ती पूर्णपणे बरी झाली आहे असं राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी सांगितले. याबाबत एएफपी न्यूज एजेन्सीने ट्विट करुन माहिती दिली आहे.
#BREAKING Russia has developed 'first' coronavirus vaccine: Putin pic.twitter.com/s33LTMO0j0
— AFP news agency (@AFP) August 11, 2020
रशियामध्ये कोरोनाची लस विकसित करण्याचं काम गामेल्या रिसर्च इंस्टिट्यूटकडून केलं जात होतं. ही संस्था रशियाच्या आरोग्यमंत्रालयाच्या अंतर्गत आहे. नॅशलन रिसर्च सेंटरचे निर्देशक अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार एडेनो व्हायरसवर आधारीत ही लस तयार करण्यात आली आहे. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून या लसीमुळे व्यक्तीच्या आरोग्याला नुकसान पोहोचण्याची शक्यता फार कमी आहे असा दावा करण्यात आला होता.
कशी घेतली लसीची चाचणी?
अलेक्जेंडर गिंट्सबर्ग यांनी सांगितले होते की, काही लोकांना लस दिल्यानंतर ताप आल्याचे दिसून आले. कारण लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा शरीराचं तापमान वाढतं. पण सामान्य पॅरासिटोमॉल किंवा इतर औषध घेऊन ताप सहज कमी होऊ शकतो. चाचण्या केल्यानंतर स्वयंसेवकांच्या आरोग्यावर सकारात्मक बदल घडून आले असून रोगप्रतिकारकशक्ती वाढली. वरिष्ठ नागरिक आणि आरोग्य सेवेतील कामगारांना लस सगळ्यात आधी देण्यात येणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चाचणीदरम्यान या लसीचे सकारत्मक परिणाम दिसून आले आहेत. ऑक्टोबरमध्ये देशभरात लसीकरण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.