CoronaVirus: ठेवा स्वच्छता अन् राखा अंतर; कोरोना राहील दूर निरंतर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 02:23 AM2020-04-19T02:23:59+5:302020-04-19T02:25:51+5:30

सध्या लॉकडाऊन असला, तरी काही ना काही कारणांमुळे, अशा वेळेस विशेषत: आवश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना कामानिमित्त बाहेर पडावे लागते.

CoronaVirus simple and easy tips for avoiding infection of covid 19 | CoronaVirus: ठेवा स्वच्छता अन् राखा अंतर; कोरोना राहील दूर निरंतर

CoronaVirus: ठेवा स्वच्छता अन् राखा अंतर; कोरोना राहील दूर निरंतर

googlenewsNext

- डॉ. मंगला बोरकर

कोविड-१९ (कोरोना) विषाणू दोन मार्गांनी पसरतो. समोरची व्यक्ती खोकली, शिंंकली, जोरात बोलली, तर नाका-तोंडातून सूक्ष्म कण बाहेर पडतात. जे दिसतसुद्धा नाहीत. ती व्यक्ती जर कोरोना विषाणूने (कोविड-१९) बाधित असली, तिला लक्षणे नसली किंंवा सौम्य लक्षणे असली तरी ती २-३ आठवडे हे विषाणू अशा प्रकारे इतरांमध्ये पसरवू शकते. ही व्यक्ती खोकताना, शिंंकताना बाहेर पडणारे स्रावाचे सूक्ष्म कण काही मिनिटे हवेत तरंगून जमिनीवर/ फरशीवर आजूबाजूच्या वस्तूंवर पडतात. त्यातील विषाणू काही तास ‘जिवंत’ राहून इतरांना संसर्गित करू शकतात. यासाठी १) सर्वांनी मास्क वापरणे आणि इतरांपासून शक्यतो सहा फूट तरी अंतर ठेवणे. २) आपण ज्या वस्तूंना हात लावतो त्यांना वारंवार स्वच्छ करणे. ३) स्वत:चे हात आणि चेहरा वेळोवेळी धुणे, शक्यतो दर तासाने धुणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत.

सध्या लॉकडाऊन असला, तरी काही ना काही कारणांमुळे, अशा वेळेस विशेषत: आवश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना कामानिमित्त बाहेर पडावे लागते. या वेळेस नकळत आपण वेगवेगळ्या वस्तूंना हात लावत असतो. या वस्तूंना जर एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीने हात लावला असेल तर आपल्या हातांनासुद्धा संसर्ग होऊ शकतो. मग असा हात जर नाक, तोंड, डोळे यांना लागला, तर या भागाच्या र्श्लेम पटलातून (ओल्या भागातून) कोरोनाचे जंतू प्रवेश करू शकतात.

बºयाच दुकानांतून विकत घेतो त्या वस्तू (दूध पिशव्या, ब्रेड, बिस्किटाचे पाकीट आदी) भाज्या, फळे आदी वैयक्तिक खरेदी केलेल्या वस्तूंपैकी शक्य असेल त्या वस्तू साबणाच्या पाण्याने धुवाव्यात. दारातच एक बादली साबणाच्या पाण्याने भरून व दुसरी नुसती पाण्याची अशा ठेवाव्यात. बाहेरून आले की, दूध पिशव्या, प्लॅस्टिकचे आवरण असलेली पाकिटे साबणाच्या पाणी असलेल्या बादलीत १०-२० मिनिटे राहू द्यावीत. यानंतर स्वच्छ पाण्याने धुवावीत. भाजी, फळे, साध्या पाण्याच्या बादलीत अर्धा-एक तास पडू द्यावीत.

ज्या वस्तू खराब होणार नाहीत त्या सुरक्षित ठिकाणी व्हरांड्यात ठेवून द्याव्यात. काही तासांनंतर घरात आणाव्यात. उन्हात ठेवणे शक्य असेल तर उत्तमच. बूट, चपला बाहेर काढाव्यात. हात स्वच्छ धुवावेत. मास्क धुवावा, परत हात धुवावेत. जमेल तितका आॅनलाईन, फोनवर व्यवहार करावा. बाहेर पडताना शक्य असेल तर सॅनिटायझर जवळ ठेवावे. हल्ली बºयाच दुकानांत बँकांच्या किंवा कार्यालयांच्या प्रवेशद्वाराशी सॅनिटायझर ठेवलेले
असते, ते वापरावे. जर सुटे पैसे परत घेणे असेल तर पिशवी/ पाकीट उघडून त्यात टाकण्यासाठी दुकानदाराला सांगावे. ती पिशवी/ पाकीट बाजूला ठेवून द्यावे. ते पैसे २-३ दिवसांनंतर वापरावेत. एटीएम कार्ड स्पिरीट सॅनिटायझरने पुसावे किंंवा निदान ते पाकिटात ठेवल्यानंतर स्वत:चे हात स्वच्छ करावेत. कारण आपला हेतू वस्तूंवरून आपल्या हाताला विषाणूंचा संसर्ग होऊ नये, हाच असतो.

सार्वजनिक ठिकाणी नेहमी हाताळल्या जाणाºया वस्तू
दारांच्या कड्या / हॅण्डल
जिने/एस्केलेटर/ बाल्कनीचे कठडे ( रेलिंंग)
चाव्या
लिफ्टचे बटन
फॅन/ लाईटचे बटन
टेबलचा पृष्ठभाग
खुर्च्यांचे हॅण्डल
ऑफिस फोन
प्रिंंटर, स्कॅनर, माऊस, की बोर्ड
चहा-कॉफीची मशीन
पेन, फाईल इत्यादी
बाहेरून आल्यानंतर हात-पाय, तोंड धुणे. कपडे बदलून बाहेर एखाद्या बादलीत/खोक्यात जमल्यास उन्हात टाकणे, शक्यतो आंघोळ करणे, ही काळजी कायमची अंगवळणी पाडून घेतली पाहिजे. आपण आपली आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्यासाठी ही खबरदारी घेणे आवश्यक आहे.

‘कोविड-१९’ प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना
ऑफिसची फरशी : फिनाईल / १ टक्के सोडियम हायपोक्लोराईट
वस्तू (खुर्ची, टेबल, संगणक, की- बोर्ड, माऊस) : फिनाईल/एक टक्के सोडियम हायपोक्लोराईट स्पिरिट
धातूंच्या वस्तू, दारांचे हॅण्डल, कड्या, रेलिंंग : ७० टक्के अल्कोहोल/ सॅनिटायझर / स्पिरीट
साबणाच्या पाण्यानेसुद्धा वरील काही वस्तू स्वच्छ करता येऊ शकतात. सार्वजनिक स्वच्छता करणाºया व्यक्तीने मास्क बांधून, रबरचे हातमोजे, शक्यतो गमबूट घालावेत. स्वच्छता झाल्यावर स्वत:चे हात-चेहरा साबण व पाण्याने स्वच्छ करावेत. टॉयलेटचे भांडे /कमोड / झाकण फरशी, सोप डिस्पेंसर, नळ हे १ टक्के सोडियम हायपोक्लोराईड, साबण किंवा डिटर्जंटचे पाणी वापरून स्वच्छ करावेत.
स्वच्छता करण्यासाठी वापरण्यात येणारे कपडे, ब्रश आधी आणि नंतरही स्वच्छ करायला हवीत आणि स्वच्छ करणाºयाने स्वत:चे हात आणि चेहराही स्वच्छ करावा. सार्वजनिक वापराच्या टॉयलेटच्या दारांच्या हँडलकडे, नळांकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

सोडियम हायपोक्लोराईट म्हणजेच ब्लीच. एक टक्के सोडियम हायपोक्लोराईटचे ताजे द्रव अशा प्रकारे तयार करा.
लिक्विड ब्लीच (३.५ टक्के) - अडीच भाग पाण्यात १ भाग मिसळावे
लिक्वीड ब्लीच (५ टक्के)- ४ भाग पाण्यात १ भाग मिसळावे
ब्लीचच्या १.५ ग्रॅमच्या गोळ्या- एक लिटर पाण्यात ११ गोळ्या
ब्लीचिंग वापडर - एक लिटर पाण्यात ७० ग्रॅम टाकावे.

(लेखिका ज्येष्ठ औषधवैद्यकतज्ज्ञ असून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी), औरंगाबाद येथे वार्धक्यशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत).

Web Title: CoronaVirus simple and easy tips for avoiding infection of covid 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.