Coronavirus: शिंक, खोकल्याने १० मीटर अंतरापर्यंत पसरतो कोरोना; बचावासाठी कोणता मास्क घालावा?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 06:31 AM2021-05-21T06:31:02+5:302021-05-21T06:31:29+5:30
थुंकी आणि श्लेष्माचे (फ्लेम) कणसुद्धा दीर्घकाळ विषाणू पसरण्याचे कारण होऊ शकतात; म्हणूनच अनेक राज्यांत सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर थुंकल्यास दंडाची तरतूद केलेली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या नवीन सल्लात्मक मार्गदर्शक सूचनेनुसार एखाद्या संसर्गित व्यक्तीच्या खोकल्यातून आणि शिंकेतून कोरोनाचे विषाणू हवेत दहा मीटर अंतरापर्यंत पसरू शकतात. तेव्हा मास्क नेहमी घालणे जरुरी आहे. एवढेच नव्हेतर, लक्षण नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा खोकला आणि शिंकेतून विषाणूचा फैलाव होऊ शकतो. शिंक आणि खोकल्यातून जमिनीवर पडणारे तुषार आणि सूक्ष्म तुषार कणसुद्धा संसर्गाचे कारण होऊ शकतात.
थुंकी आणि श्लेष्माचे (फ्लेम) कणसुद्धा दीर्घकाळ विषाणू पसरण्याचे कारण होऊ शकतात; म्हणूनच अनेक राज्यांत सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर थुंकल्यास दंडाची तरतूद केलेली आहे. नेहमी हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंची (जसे दरवाजाची कडी-कोयंडा, दिव्याची बटणे, टेबल, खुर्ची आदी) निर्जंतुकीकरण द्रवपदार्थाने नियमित साफसफाई करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. या सल्लात्मक मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या ठिकाणी हवा खेळती (व्हेन्टिलेशन- वायूविजन) आहे, अशा ठिकाणी संसर्ग पसरण्याचा धोका कमी असतो. त्यासाठी घर आणि कामाच्या ठिकाणी हवा खेळती ठेवणारी चांगली व्यवस्था असावी.
दुहेरी किंवा एन-९५ मास्क...
कोरोनापासून बचावासाठी दुहेरी मास्क (डबल मास्क) किंवा एन-९५ मास्क घालावा. कापडी मास्क वापऱ्याचा असल्यास दोन मास्क घालावेत; परंतु, सर्जिकल मास्क असेल तर एक पुरेसा आहे. डबल मास्क पाचवेळा वापरता येतो. संसर्गित व्यक्तीच्या नाका-तोंडातून शिंक, गातांना, खोकलताना, बोलताना, हसतांना बाहेर पडणारे तुषार, हे संसर्ग वहनाचे मार्ग आहेत.