Coronavirus: कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार - डॉ. संजय ओक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 11:42 PM2020-08-23T23:42:23+5:302020-08-24T07:12:22+5:30

आपण सगळे कोविडमध्ये गुंतून पडलो, पण त्यामुळे नंतर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष झाले आहे. कोविड झालेल्या व्यक्तीची काळजी नंतरचे ४० दिवस ते ४ महिने घेणे आवश्यक आहे,

Coronavirus: Types of blood clots in people with coronavirus - Dr. Sanjay Oak | Coronavirus: कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार - डॉ. संजय ओक

Coronavirus: कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या रक्तात गुठळ्या होण्याचे प्रकार - डॉ. संजय ओक

googlenewsNext

अतुल कुलकर्णी 

मुंबई : कोरोना होऊन गेलेल्या काही रुग्णांमध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया किंवा निरनिराळ्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ््या होण्याचे प्रकार दिसून आले आहेत. काही रुग्णांमध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या दिसून आल्या आहेत. परिणामी त्यातील काहींचे हृदयविकाराने निधन झाल्याचे समोर आले आहे, अशी माहिती सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी लोकमतला दिली.

यासाठी अ‍ॅलोपॅथीसोबतच फिजिओथेरपी देखील महत्त्वाची आहे. श्वसनाचे वेगवेगळे व्यायाम आवश्यक असल्याचेही डॉ. ओक यांनी स्पष्ट केले. आपण सगळे कोविडमध्ये गुंतून पडलो, पण त्यामुळे नंतर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष झाले आहे. कोविड झालेल्या व्यक्तीची काळजी नंतरचे ४० दिवस ते ४ महिने घेणे आवश्यक आहे, असे आता वेगवेगळ्या निष्कर्षातून समोर आले आहे. त्यासाठी शासनाने ‘पोस्ट सिंड्रोम ओपीडी‘ तयार करावी, त्यात तज्ज्ञ डॉक्टर असावेत, त्यात रक्ताच्या चाचण्या व्हाव्यात, सिटीस्कॅनसह पल्मनरी फंक्शन टेस्ट केली जावी, अशा सूचना टास्क फोर्सने सरकारला केल्याचे डॉ. ओक यांनी सांगितले.

हृदयविकाराचा धोका
अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले, पण दहा दिवसानंतर त्यांचे हृदयविकाराने निधन झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचे कारण रक्ताच्या गुठळ्या तयार होणे हे आहे. या गुठळ्या शरीरात दूरवर पसरलेल्या रक्तवाहिन्यांमध्ये देखील होत आहेत. काही रुग्णांमध्ये पायाच्या रक्तवाहिन्यांत अशा गुठळ्या होतात, असे दिसून आले आहे. त्यामुळे पायाच्या पोटºया दुखणे, विलक्षण थकवा येणे असे परिणाम दिसत आहेत. त्यापेक्षाही भयंकर म्हणजे, मेंदूकडे जाणाºया रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ््या झाल्याने पक्षाघात होण्याचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे, असे डॉ. ओक म्हणाले.

श्वसनाचे व्यायाम करा
अ‍ॅलोपॅथीमध्ये रक्त पातळ होण्यासाठीचे औषध रुग्णाला दिले जाते. सुरुवातीच्या काळात अशी औषधे दिलेली नव्हती. मी स्वत: आजारी पडलो, त्यानंतर म्हणजे मे-जून नंतर दहा दिवसांच्या औषधांचा कोर्स दिला जात आहे. आता मात्र ज्यांना रक्त आणि हृदयाचे त्रास आहेत अशांना सरसकट रक्त पातळ होणारी औषधे दिली जात आहेत. मात्र त्याला मर्यादा असल्याचे सांगून डॉ. ओक म्हणाले, अशी औषधे फार काळासाठी अशा रुग्णांना देता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या यकृ तावर त्याचा परिणाम होऊ शकतो. रेमडेसीविर हे औषध देखील अशा रुग्णांच्या यकृ तावर परिणाम करते, हे ज्ञात आहे. अशा परिस्थितीत अ‍ॅलोपॅथीला मर्यादा पडत आहेत, असे सांगून डॉक्टर ओक म्हणाले, आता फिजिओथेरपीला पर्याय नाही. दुर्दैवाने आपण त्याकडे लक्ष दिलेले नाही. अशा रुग्णांची फुप्फुस व्यवस्थित होण्यासाठी ८ ते १२ आठवडे लागतात. त्यासाठी रोज ४५ मिनिट श्वसनाचे व्यायाम करणे आवश्यक असल्याचेही डॉ. ओक म्हणाले.

स्वत: डॉक्टर बनू नका
आयुर्वेदामध्ये असंख्य वनस्पती अशा आहेत ज्यांचा श्वसन प्रक्रियेवर परिणाम होतो. लेंडीपिंपळी वनस्पतीचा दुधातून काढा मी स्वत: घेत आहे. दालचिनी, लवंग पाण्यात भिजवून त्याचे सेवन करत आहे. यामुळे प्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. मात्र अशा औषधांची, त्याच्या खरेपणाची तपासणी करूनच ती घ्यावी, त्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरना विचारा. त्यांच्या सल्ल्याने काढे, औषधे घेतली पाहिजेत.
स्वत: परस्पर डॉक्टर होऊ नका आणि आयुर्वेदिक काढे मनाने घेऊ नका, असा सल्लाही डॉ. ओक यांनी दिला.

Web Title: Coronavirus: Types of blood clots in people with coronavirus - Dr. Sanjay Oak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.