Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’; कमी बोला, हळू बोला, कोरोना टाळा!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 01:49 AM2020-07-01T01:49:50+5:302020-07-01T01:50:03+5:30
तुम्ही एक मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहात आणि बंद खोलीत कोणी मोठ्याने बोलले तर तुम्हाला कोरोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो
डॉ. अमोल अन्नदाते
आपण खोकणे, शिंकणे या बाबतीत काळजी घेतो पण अजून एक गोष्ट आहे जी कोरोनाचा संसर्ग वाढवण्यास कारणीभूत ठरू शकते. ती म्हणजे बोलणे. अनेकांना मोठ्याने बोलण्याची सवय असते. त्यातच फोनवर बोलताना ग्रामीण भागात अजूनही असा समज आहे कि मोठ्याने बोलल्याशिवाय मोबाईलवर आवाज नीट जात नाही. म्हणून सार्वजनिक ठिकाणी मोबाईलवर अनेक जण मोठ्याने बोलत असतात. तसेच मोबाईलवर बोलताना किंवा समोरासमोर बोलताना समोरच्याला नीट कळावे म्हणूनही अनेकजण नेमका त्याच वेळी मास्क खाली करतात.
संशोधन काय सांगते
तुम्ही एक मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहात आणि बंद खोलीत कोणी मोठ्याने बोलले तर तुम्हाला कोरोनाबाधित व्यक्तीकडून संसर्ग होऊ शकतो. मोठ्याने बोलल्याने १००० मायक्रो ड्रॉपलेट हवेत सोडले जातात व मास्क नसेल आणि खोली बंद असेल तेव्हा ते एकमीटरपेक्षा जास्त अंतरावर पसरतात. तसेच विषाणू १४ मिनिटे म्हणजे हळू बोलण्याच्या तुलनेत जास्त वेळ हवेत राहतात. जर हळू आवाजात बोलले आणि मास्क लावलेला असला तर ही शक्यता खूप कमी होते.
बोलताना पुढील काळजी घ्या
समोरच्याला ऐकू जाईल एवढ्याच आवाजात हळू बोला. फोनवर व समोरासमोर बोलताना मास्क खाली करू नका. उलट मास्कने नीट नाक, तोंड झाकले आहे का हे तपासा व मग बोला. कमी बोला, सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक बोलू नका. कार्यालयात, सार्वजनिक ठिकाणी ज्या गप्पा मारायच्या होत्या त्या घरी येऊन फोन वर किंवा व्हिडीओ कॉलवर मारा. बोलताना एक मीटर पेक्षा लांब उभे राहा व चेहरा समोरासमोर येणार नाही असे उभे राहून किंवा बसून बोला. कार्यालयात बैठक घ्यायची असल्यास दार, खिडक्या उघड्या ठेवा.
कोरोनाबाधित होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तीने समोरासमोर घरातील व्यक्तीशी बोलूच नये. काय हवे, नको ते बंद दाराआडून सांगावे कोरोनाबाधित व्यक्तीशी बोलायचेच असल्यास दोघांनी मास्क वापरून एकमेकांना ९० डिग्री मध्ये उभे राहून बोलावे.
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)