Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’: बालकांमध्ये कावासाकी आजारासारखी लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 03:35 AM2020-07-04T03:35:30+5:302020-07-04T03:35:51+5:30
कोरोनामध्ये कावासाकी डीसिज होत नाही पण त्या आजारासारखी लक्षणे येतात आणि या आजाराप्रमाणे काही काळासाठी हृदयाभोवती सूज येऊन उपचारांची गरज पडू शकते
डॉ. अमोल अन्नदाते
भारतात लहान मुलांमध्ये कोरोना अगदी सौम्य स्वरूपाचा असून घातक नसला तरी काही ठिकाणी कावासाकी या आजारासारखी लक्षणे कोरोना संसर्गाच्या ३ ते ४ आठवड्यांनंतर दिसून आली आहेत.
कावासाकी डीसिज् काय आहे?
कावासाकी हा ५ वर्षाखालील मुलांना होणारा व रक्तवाहिन्या, हृदयावर परिणाम करणारा आजार आहे.
कोरोनामध्ये नेमके काय होते ?
कोरोनामध्ये कावासाकी डीसिज होत नाही पण त्या आजारासारखी लक्षणे येतात आणि या आजाराप्रमाणे काही काळासाठी हृदयाभोवती सूज येऊन उपचारांची गरज पडू शकते. याचे प्रमाण खूप कमी म्हणजे १ लाखात १ असले तरी हे लवकरात लवकर ओळखता आले आणि त्वरित उपचार सुरु करता आले तर त्याचा फायदा होतो व गुंतागुंत टळते. म्हणून हे सर्र्वाना माहित असणे आवश्यक आहे.
कोरोनामध्ये कावासाकीसदृश्य आजार नेमका कधी होतो ?
हा आजार कोरोना संसर्ग सुरु असताना नव्हे तर कोरोना संपून गेल्यावर तीन ते ४ आठवड्यांनंतर होतो. कोरोनानंतरच्या कावासाकी
सदृश्य आजाराची लक्षणे काय ?
ताप, अंगावर लालसर चट्टे, चिडचिड करणे, अस्वस्थ वाटणे ही कोरोना नंतरच्या कावासाकी सदृश्य आजाराची मुख्य लक्षणे आहेत. मुलाला कोरोना संसर्ग झाल्यावर ३ ते ४ आठवड्यांनंतर ही लक्षणे आली तर त्वरित आपल्या बालरोगतज्ञांचा सल्ला घ्यावा. कोरोना संसर्ग नसेल व घरातील कोरोना संसर्गित व्यक्तीशी संपर्क आला व ही लक्षणे आली तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घाबरून जाऊ नये. हा आजार कावासाकी नसून कावासाकीसारखा आहे, म्हणून मुलांवर कोरोना संसर्गानंतर लक्ष ठेवावे. याचे प्रमाण खूप कमी आहे व झाले तरी यावरउपचार करता येतात म्हणून मुळीच घाबरून जाऊ नये.
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)