Coronavirus: समजून घ्या ‘कोरोना’! लहान मुलांसाठी व्हिटॅमीन डी उपयोगी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 11:39 PM2020-05-07T23:39:10+5:302020-05-07T23:39:19+5:30
जन्मानंतर पहिल्या महिन्यात बाळाला तेलाने मसाज करून उघड्यावर सूर्यप्रकाशात अंघोळ घातली आणि १० मिनिटे सूर्यप्रकाश मिळू दिला,
डॉ. अमोल अन्नदाते
मोठ्या व्यक्तींप्रमाणेच लहान मुलांना अगदी जन्मापासून व्हिटॅमीन डीची गरज असते. हाडांसोबतच प्रतिकारशक्ती व त्यातच श्वसनाच्या जंतू संसर्गाविरोधात व्हिटॅमीन डीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. दमा असलेल्या मुलांमध्ये व्हिटॅमीन डीची पातळी नॉर्मल राहणे गरजेचे असते. आईच्या दुधात इतर सर्व घटक असतात; पण व्हिटॅमीन डीबाबत मात्र ते कमी पडते. तसेच याच्या पूर्ततेसाठी सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान अर्धा तास मुलांना उन्हात ठेवणे व्यावहारिक नाही. त्यामुळे सर्व वयोगटातील लहान मुलांना व्हिटॅमीन डीची गरज भासते. ज्यांना रोज उन्हात अंघोळ घातली जाते, असे बालक याला अपवाद असू शकतात.
जन्मानंतर पहिल्या महिन्यात बाळाला तेलाने मसाज करून उघड्यावर सूर्यप्रकाशात अंघोळ घातली आणि १० मिनिटे सूर्यप्रकाश मिळू दिला, तर मात्र त्यांना व्हिटॅमीन डीचे औषध देण्याची गरज पडणार नाही, असे लहान मुलांचे संप्रेरक तज्ज्ञ डॉ. तुषार गोडबोले सांगतात. पण, पहिल्या महिन्यात सूर्यप्रकाश मिळत नसल्यास मात्र जन्मापासूनच व्हिटॅमीन डीचे औषध ४०० कव रोज एक वेळ पहिले वर्ष द्यावे. यानंतर रोज ४०० ते ६०० कव प्रतिदिन देणे अपेक्षित आहे; पण रोज औषध देणे शक्य होत नाही. यासाठी एका वर्षानंतर ६०,००० कव आठवड्यातून एकदा ६ आठवडे व नंतर ऋतू बदलला म्हणजे प्रत्येक वेळी व्हिटॅमीन डी एकदा द्यायला हवे. ढोबळपणे दर ३ महिन्यांतून एकदा ६०,००० कव असा हा डोस येतो. याशिवाय मुलांच्या उन्हात खेळण्याला प्राधान्य दिले गेले पाहिजे. शाळांमध्ये खेळण्याचे तास हे सकाळी १० ते दुपारी ४ च्या दरम्यान ठेवण्यात यावेत. मुलांच्या शरीरातील व्हिटॅमीन डीचे प्रमाण ५० नॅनोग्रॅम प्रति मिलिलिटरपेक्षा जास्त असल्यास पुरेसे समजावे. त्यापेक्षा कमी असल्यास पूर्ण उपचारासाठी वयाप्रमाणे डोस द्यावा लागतो. त्यासाठी आपल्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)