Coronavirus Vaccination : १२-१८ वयोगटातील मुलांना दिली जाणार लस; ‘नायर’मध्ये मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 06:32 AM2021-07-13T06:32:57+5:302021-07-13T06:36:52+5:30
Coronavirus Vaccine for 12-18 Years Of Age : १२ ते १८ वयोगटातील ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्याचा प्रयोग.
मुंबई : ‘झायडस कॅडिला’ कंपनीने मुंबई महापालिकेच्या पत्राला सकारात्मक उत्तर देत लसीकरणासाठी तयारी दर्शवली आहे. त्यानुसार नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोविड प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यामध्ये ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्यात येणार आहे. यासाठी सोमवारपासून नोंदणी सुरू करण्यात आली आहे.
कोरोनाची दुसरी लाट मुंबईत आता पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असून, लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने जम्बो कोविड केंद्र, कोरोना काळजी सेंटरमध्ये खाटांची व्यवस्था केली आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी पेडियाट्रिक वॉर्ड सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
तर दुसरीकडे पालिकेने लहान मुलांच्या लसीकरणासाठी महिनाभरापूर्वी ‘झायडस कॅडिला’ कंपनीला पत्र दिले होते. यास सकारात्मक प्रतिसाद देत झायडस कॅडिला कंपनीने लहान मुलांवरील लसीकरण करण्यास तयारी दाखवली आहे. यासाठी नायर रुग्णालयात पहिल्याच दिवशी दोन मुलांनी नोंदणीही केली आहे. नोंदणी झाल्यानंतर तातडीने लसीकरण केले जाणार आहे.
- कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस १८ वर्षे वयोगटावरील नागरिकांना नोंदणीनुसार ८४ दिवसांनंतर दिला जात आहे, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस २८ दिवसांनी दिला जातो. मात्र, १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांना ‘झायकॉडी’ लसीचे तीन डोस दिले जाणार आहेत.
- पहिल्या दिवशी, २८व्या दिवशी आणि ५६व्या दिवशी डोस दिला जाणार आहे. लहान मुलांच्या लसीकरणासाठी नायरमध्ये प्रशिक्षित कर्मचारी व आवश्यक सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.