"चीन-सिंगापूरमध्ये वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; भारतात 12-14 वयोगटातील मुलांना जास्त धोका"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2022 05:05 PM2022-03-15T17:05:15+5:302022-03-15T17:05:54+5:30
coronavirus vaccine : चीन, सिंगापूरसारख्या देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असताना या वयातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
नवी दिल्ली : देशात 16 मार्चपासून 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना विषाणूची लस दिली जाणार आहे. त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. चीन, सिंगापूरसारख्या देशांमध्ये संसर्गाची प्रकरणे वाढत असताना या वयातील मुलांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे.
लसीकरण सुरू होण्यापूर्वी, कोव्हिड वर्किंग ग्रुप आणि नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप इमुनायझेशनच्या (NTAGI) अध्यक्ष डॉ . एन के अरोरा यांनी सांगितले की, आम्ही 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू केले आहे, कारण त्यांना जास्त धोका आहे. चीन आणि सिंगापूरमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. वयस्कर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असले तरी कोणतीही हलगर्जीपणा धोकादायक ठरू शकतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, सरकारच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले आहे की, "मुले सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे! मला हे सांगताना आनंद होत आहे की 12 ते 13 व 13 ते 14 वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण 16 मार्चपासून सुरू होत आहे. 60 आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील सर्वजण आता खबरदारीने डोस मिळवू शकतील."
मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारने वैज्ञानिक संस्थांशी सल्लामसलत केल्यानंतर 16 मार्चपासून 12 ते 13 वर्षे आणि 13 ते 14 वर्षे वयोगटातील म्हणजेच 2008, 2009 आणि 2010 मध्ये जन्मलेली मुले, जी आधीच 12 वर्षांची आहेत, त्यांच्यासाठी लसीकरण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वयोगटातील जवळपास 7.11 कोटी बालकांना लसीकरण केले जाईल.