Coronavirus : शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास मृत्यूचा धोका अधिक - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 11:59 AM2020-05-11T11:59:21+5:302020-05-11T11:59:50+5:30
याआधी काही रिसर्चमधे व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि श्वासनलिकेत इन्फेक्शन याबाबत काही गोष्टी समोर आल्या होत्या.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसबाबत सतत वेगवेगळे रिसर्च समोर येत आहेत. असाच एक कोरोना व्हायरसने मृत्यू होणाऱ्या रूग्णांबाबतचा एक रिसर्च समोर आला आहे. ब्रिटनच्या अभ्यासकांनी शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेस, तसेच यूरोपिय देशांमध्ये झालेल्या मृत्यू दरातील एक धागा शोधून काढला आहे. याआधी काही रिसर्चमधे व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि श्वासनलिकेत इन्फेक्शन याबाबत काही गोष्टी समोर आल्या होत्या.
द ट्रिब्यूनने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, यूकेतील एंग्लिया रस्किन यूनिव्हर्सिटीचे डॉ. ली स्मिथ यांनी सांगितले की, 'आम्हाला शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता, कोविड-19 च्या केसेस आणि खासकरून याने वाढणारा मृत्यूदर यातील एक धागा सापडला आहे.
संशोधकांनुसार, व्हिटॅमिन डी शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींच्या काम करण्याला प्रभावित करतं. व्हिटॅमिन डी शरीरात व्हाईट ब्लड सेल्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशीना सायटोकाइन नावाच्या सेल्सना वाढण्यास रोखतं. हे सेल्स कोरोना व्हायरसने ग्रस्त रूग्णांमध्ये अधिक प्रमाणात निर्माण होतात.
डॉ. स्मिथ यांनी सांगितले की, याआधी करण्यात आलेल्या रिसर्चमधून समोर आले होते की, हॉस्पिटल्स आणि केअर सेंटरसारख्या संस्थांनांमध्ये 75 टक्के लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची फारच कमतरता होती. त्यासोबतच ते म्हणाले की, हा रिसर्च सध्या फारच कमी ठिकाणांवर करण्यात आलाय.
रिसर्चनुसार, असं आढळून आलं की, व्हिटॅमिन डी श्वासासंबंधी इन्फेक्शनपासून वाचवतं. त्यासोबतच हेही समोर आलं की, ज्या वृद्धांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता होती, तेच सर्वात जास्त कोरोनाने प्रभावित झाले.
प्रत्येक देशात रूग्णांची संख्या देशात होणाऱ्या कोरोना टेस्टच्या नंबरवर आधारित आहे. तसेच प्रत्येक देशात इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी वेगवेगळे उपाय केले गेले आहेत. त्यांनी यावर जोर दिला की, भलेही व्हिटॅमिन डी ची कमतरता आणि कोरोना यात काही संबंध असेल, पण याचा अर्थ असा नाही की, शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता हेच कोरोना व्हायरसची लागण होण्याचं कारण आहे.