CoronaVirus News: कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या उलट्या, जुलाबाची लक्षणं काहीशी वेगळी... जाणून घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 02:03 AM2020-06-19T02:03:20+5:302020-06-19T11:11:22+5:30
कोरोनामध्ये पोटात अन्न नसतानाही उलट्या होऊ शकतात. तसेच, सकाळी उठल्या वर ही लगेच उलट्या होऊ शकतात.
>> डॉ. अमोल अन्नदाते
‘कोरोना’चे बरेच रुग्ण हे जुलाब व उलट्या हे पहिले लक्षण घेऊनही येत आहेत; पण हे उलट्या-जुलाब कसे असतात हे आपल्याला माहीत असले पाहिजे. साधारणत: उलट्या या जेवल्यावर किंवा पोटात काहीतरी अन्न असताना होतात. पण कोरोनामध्ये मात्र पोटात अन्न नसतानाही उलट्या होऊ शकतात. तसेच, सकाळी उठल्या वर ही लगेच उलट्या होऊ शकतात.
जुलाब हे दोन प्रकारचे असतात. पहिला ज्याचा उगम छोट्या आतड्यांमध्ये अन्न न पचल्याने होतो. हे छोट्या आतड्यांच्या कार्यातील बिघाडामुळे होणारे जुलाब पाण्यासारखे, कुठल्याही प्रयत्नाशिवाय अपोआप होणारे व रक्त किंवा शेम नसलेले असतात. जे जुलाब पाण्यासारखे नसतात, घट्ट असतात, जुलाब होताना दुखते आणि शेम पडते, असे जुलाब मोठ्या आतड्याची कार्यक्षमता घटल्यामुळे होतात. शक्यतो कोरोनासारख्या व्हायरसचा परिणाम छोट्या आतड्यांवर होतो व बॅक्टेरियाचा परिणाम हा मोठ्या आतड्यांवर होतो. म्हणून कोरोनामुळे पाण्यासारखे पातळ, वेदना न होता, शेम नसलेले जुलाब होतात. हे जुलाब पातळ असले तर कोलेरासारखे एकाच वेळी जास्त प्रमाणात होत नसून त्या मानाने कमी प्रमाणात असतात. दिवसातून ४ ते ५ वेळा होतात आणि ५ ते ७ दिवस चालतात. यासोबत ताप, पोटदुखी, डोकेदुखी ही लक्षणेही असतात. बऱ्याचदा श्वासाशी निगडित लक्षणे जुलाब असलेल्या रुग्णांमध्ये उशिरा येतात. जुलाब कोरोना सोडून इतर कारणांमुळेही असू शकतात व कोरोना रुग्णाचा संपर्क जुलाब कोरोनामुळे आहेत का, याची शहानिशा करण्यास महत्त्वाचे ठरते .
जुलाब असल्यास
आपल्या डॉक्टरांशी संपर्क करावा.
शौचालय भरपूर पाण्याचा वापर करून स्वच्छ ठेवावे.
दिवसातून एकदा शौचालयात ब्लिचिंग सोल्यूशन किंवा सोडियम हायपोक्लोराइटयुक्त पाणी टाकावे.
शौचालयाच्या नळावर व दाराचे हँडल दिवसातून काहीवेळा सॅनिटायजर स्प्रे मारून पुसून घ्यावे.
कमोड वापरत असल्यास शौचालयाचे झाकण फ्लश केल्यावर बंद करावे.
एक लिटर पाणी, सहा चमचा साखर, अर्धा चमचा मीठ टाकून हे पाणी तहान लागेल तसे वारंवार प्यावे व दिवसातून दोन ते तीन वेळा नारळाचे पाणी प्यावे.
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)