Coronavirus: काय सांगता! कोरोना झालाय की नाही हे कुत्रे शोधू सांगतात; अँटिजन, RTPCR चाचणीपेक्षाही जलद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 07:50 AM2021-05-22T07:50:50+5:302021-05-22T07:51:17+5:30
‘अँटिजन’ पेक्षा कुत्रे वेगाने करतात कोरोनाचे निदान; फ्रान्समधील वैज्ञानिकांचे संशोधन
नवी दिल्ली : कोरोनामुळे सध्या जगभरच हाहाकार उडाला आहे. या रोगावर औषधे, प्रतिबंधात्मक लस शोधण्याबाबत युद्धपातळीवर संशोधन सुरु आहे. लागण झाली आहे की नाही याचे निदान करण्यासाठी नवनव्या पद्धती शोधल्या जात आहेत.
अशातच फ्रान्समधील वैज्ञानिकांना केलेल्या संशोधनात गुन्ह्याचा तपास करणारे कुत्रे एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे की नाही, हे शोधू शकतात, असे दिसून आले आहे. गुन्हे तपासासाठी मदत घेतली जात असलेले कुत्रे वास घेण्याच्या शक्तीसाठी प्रशिक्षित केलेले असतात. फ्रान्सच्या वैज्ञानिकांना असे आढळून आले आहे की, हे कुत्रे एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे आरटीपीसीआर चाचणीच्या निष्कर्षापेक्षाही जास्त अचूकपणे सांगण्यास सक्षम आहेत.
हुंगतात घामाचा वास
पॅरिसच्या नॅशनल व्हेटरनरी स्कूल ऑफ एल्फोर्डमध्ये याबाबत अधिक संशोधन करण्यात आले आहे. हे कुत्रे त्या व्यक्तीच्या घामाच्या वासावरून त्याच्यात झालेल्या कोरोना संक्रमणाबाबत अचूक अनुमान काढू शकतात, असे दिसून आले आहे. रॅपिड अँटिजन चाचणीत निदान करण्यासाठी किमान १५ मिनिटे लागतात. निदान करण्याचे हे काम कुत्रे काही मिनिटात करण्यास सक्षम आहेत.
कुत्र्यांचे निदान ९७ टक्के अचूक
पॅरिसच्या नॅशनल व्हेटरनरी स्कूल ऑफ एल्फोर्डच्या संशोधकांना संशोधनात हे आढळले की, कुत्रे त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेच्या बळावर मानवाला कोरोनाचे संक्रमण झाले की नाही याचा निष्कर्ष ९७ टक्क्यांपर्यंत अचूक सांगतात. संशोधक डॉमिनिक ग्रैंडजीन म्हणाले की, मानवी शरीर कोरोना संक्रमणाविरोधात जी प्रतिक्रिया देते ती त्याचा घाम आणि लाळेतून समोर येते. तिचा वास कुत्रे घेऊन ओळखू शकतात.