Coronavirus: डोकेदुखी आणि कोरोनाचा काय संबंध?; रिपोर्टमध्ये मुख्य लक्षणांमध्ये आढळले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 09:44 AM2022-07-04T09:44:42+5:302022-07-04T09:44:57+5:30
डोकेदुखी हे कोरोनाचे मुख्य लक्षण असले तरी डोकेदुखी झाली म्हणजे कोरोनाचा संसर्गच झाला असे नव्हे. डोकेदुखीला इतरही अनेक कारणे असू शकतात.
सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचबरोबर कोरोना हा आजार आता सौम्य झाला असून, गंभीर रुग्णांचे प्रमाण तसेच मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. असे असले तरी साथ अजून पूर्णत: संपलेली नाही तसेच एका अभ्यासात सहभागी झालेल्या ६९ टक्के रुग्णांत कोरोनाचे मुख्य लक्षण आढळून आले आहे.
डोकेदुखी वाढली आहे का?
सार्स-कोव्ही-२ या विषाणूचा व्हेरियंट ओमायक्रॉनचे बीए.४ आणि बीए.५ हे सबव्हेरियंट वेगाने पसरत आहेत. विशेषत: अमेरिका आणि ब्रिटन या देशांत नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. त्यातच ब्रिटनच्या ‘झोए कोविड स्टडी’ नावाच्या एका ॲपने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, ६९ टक्के रुग्णांत कोविड-१९ संसर्गानंतर दिसणारे प्रमुख लक्षण आढळून आले आहे. हे लक्षण म्हणजे डोकेदुखी होय.
चिंता करावी का?
कोरोना रुग्णांत डोकेदुखी हे प्रमुख लक्षण आहे. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात डोकेदुखी हेच प्रमुख लक्षण रुग्णांत असते. त्यामुळे अभ्यासातील निष्कर्ष चिंता वाढविणारा आहे. त्याचवेळी काही दिलासादायक बाबीही समोर आल्या आहेत. डोकेदुखी येते आणि जाते. हळूहळू ती कमी होत जाते, असे आमच्या डेटामधून दिसून येते.
कोरोनाची डोकेदुखी?
डोक्यात मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या वेदना होतात.
डोक्यात काही तरी मारल्यासारखे, दाब दिल्यासारखे जाणवते.
डोक्याच्या दोन्ही बाजूंनी वेदना.
डोकेदुखी तीन दिवसांपेक्षा अधिक राहते. औषधांचा उपयोग होत नाही.
डोकेदुखी म्हणजे कोरोनाच आहे का?
डोकेदुखी हे कोरोनाचे मुख्य लक्षण असले तरी डोकेदुखी झाली म्हणजे कोरोनाचा संसर्गच झाला असे नव्हे. डोकेदुखीला इतरही अनेक कारणे असू शकतात. कारण डोकेदुखी ही दैनंदिन जीवनातील सामान्य बाब आहे. तणाव, झोपेच्या सवयीतील बदल, जेवण टळणे, शरीरातील पाणी कमी होणे, ठरावीक पदार्थांचे सेवन व मद्यपान आदी अनेक कारणांनी डोकेदुखी होऊ शकते.