कोरोना रुग्णांच्या उपचारांवर प्रभावी ठरणारं रेमडेसिविर नेमकं मिळतं कुठे?, जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 12:31 PM2020-09-27T12:31:17+5:302020-09-27T12:40:28+5:30
CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाबाधित रुग्णांपैकी प्रामुख्याने आॅक्सिजनची गरज वाढत असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर हे इंजेक्शन दिले जाते.
पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले. अन्य व औषध प्रशासनाने (एफडीए) जाहीर केलेल्या औषध वितरकांपैकी पाच जणांनी हे इंजेक्शन नसल्याचे सांगितले. तर शहरात पाच बड्या रुग्णालयांशी संलग्न असलेल्या औषध दुकानांमधूनही नकारघंटा ऐकायला मिळाली. तब्बल १५ जणांकडे चौकशी केल्यानंतर एका औषध दुकानातून ‘होकार’ मिळाला.
कोरोनाबाधित रुग्णांपैकी प्रामुख्याने आॅक्सिजनची गरज वाढत असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर हे इंजेक्शन दिले जाते. शहरातील आॅक्सिजनवरील रुग्णांची संख्या जवळपास साडे तीन हजार एवढी आहे. पण इंजेक्शनची तेवढीही दैनंदिन उपलब्धता होत नाही. त्यामुळे रुग्णालयांसह नातेवाईकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. ‘एफडीए’मार्फत नुकतीच काही वितरकांच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्यापैकी दहा जणांशी एका रुग्णालयातून बोलत असल्याचे सांगून इंजेक्शनची मागणी केली. पण सहा जणांनी इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगितले.
दोघांनी हे इंजेक्शन रुग्णालयांतील औषध दुकानांमध्येच मिळू शकेल असे सुचविले. शहरातील सहा बड्या रुग्णालयांशी संलग्न असलेल्या औषध दुकानांशीही दुरध्वनीवर संपर्क साधण्यात आला. त्यापैकी केवळ एकाच दुकानामध्ये इंजेक्शन असल्याचे सांगण्यात आले. ‘आमच्या रुग्णालयामध्ये इंजेक्शनसाठी ‘वेटिंग’ आहे. कंपनीकडे इंजेक्शनची मागणी केली आहे. पण ती कधी मिळेल माहित नाही. आमच्याकडे इंजेक्शन आल्यानंतर संबंधित विभागाला कळवून इंजेक्शन देतो,’ असे एका दुकानातून स्पष्टपणे सांगितले गेले. यावर वैद्यकिय तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
इंजेक्शनचा सध्या मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. कंपन्यांकडून थेट रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. वितरकांकडे इंजेक्शन उपलब्ध नाही. काही रुग्णालयांकडून बाहेरील रुग्णांना इंजेक्शन दिले जात नसून तिथे साठा केला जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अन्य रुग्णांना इंजेक्शन मिळत नाही. यावर नियंत्रण आणण्याची गरज आहे.- सुशिल शहा, अध्यक्ष, पुणे डिस्ट्रीक्ट केमिस्ट असोसिएशन.
इंजेक्शनचा तुटवटा जाणवत आहे. पण रुग्णांच्या गरजेनुसार आम्ही उपलब्ध करून देतो. सर्व रुग्णांना हे इंजेक्शन दिले जात नाही. गरजेनुसार निवडक रुग्णांनाच दिले जाते. - डॉ. व्ही. येमुल, वैद्यकीय अधिकारी, केईएम रुग्णालय.
आमच्याकडे पुरेसे इंजेक्शन उपलब्ध आहे. पण सध्या तुटवडा कृत्रिम असल्याचे दिसते. काही रुग्णालयांकडून साठा केलेला असू शकतो. तसेच या इंजेक्शनचा वापरही खुप वाढला आहे. गरज नसलेल्या रुग्णांनाही इंजेक्शन दिले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यावर नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. - डॉ. विजय नटराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, सिम्बायोसिस रुग्णालय.
हे पण वाचा-
मोठा दिलासा! कोरोनाशी लढणाऱ्या प्रभावी अँटिबॉडी सापडल्या; संक्रमित रुग्णांचा धोका कमी होणार
डेंग्यू झाल्यानंतर तयार झालेल्या एंटीबॉडी कोरोनाचा सामना करणार; संशोधनानंतर तज्ज्ञांचा दावा
CoronaVirus : समोर आली कोरोनाची नवीन ३ लक्षणं; दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो संसर्गाचा धोका
वाढत्या संक्रमणात कोरोनाच्या कोणत्या लक्षणांना गांभीर्याने घ्यायचं?; जाणून घ्या तज्ज्ञांचं मत