coronavirus: कोरोनासाठी तपासण्या करताना...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 04:29 AM2020-07-05T04:29:50+5:302020-07-05T04:30:54+5:30
कोरोनासाठी ४ प्रकारच्या तपासण्या सध्या अस्तित्वात आहे
- डॉ. अमोल अन्नदाते
कोरोनासाठी ४ प्रकारच्या तपासण्या सध्या अस्तित्वात आहे
आरटी-पीसी आर
आयसीएमआरने निश्चित निदानासाठी सांगितलेली टेस्ट म्हणजे आरटी -पीसीआर. ही टेस्ट कोरोना विषाणूच्या जनुकीय साहित्याला ओळखून नाक व घशातून घेतलेल्या स्वॅबमध्ये कोरोना सापडतोय का हे सांगते. या साठी स्वॅब फक्त नाकातून घेतल्यास अहवाल पॉझिटिव्ह येण्याची शक्यता ६३ टक्के असते व घशातून घेतल्यास ३२ टक्के असते. उर्वरित रुग्ण पाझिटिव्ह असले तरी त्यांचा अहवाल निगेटिव्ह येऊ शकतो. स्वॅब घेत असताना डोळ्यातून पाणी येईल, इतका त्रास व्हायला हवा.
रॅॅिपड अँँटीजीन टेस्ट
या तपासणीत कोरोनाची प्रथिने ओळखून विषाणू निदान केले जाते. आरटी-पीसीआर प्रमाणेच ही टेस्ट ही नाक व घशातील स्वॅबद्वारे केली जाते. याचा अहवाल १५ मिनिटात येऊ शकतो. कोरोना निदानाचे प्रमाण आरटी - पीसीआर पेक्षा कमी आहे. रुग्ण पाझिटिव्ह आला तर नक्कीच तो पाझिटिव्ह ग्राह्य धरला जातो. निगेटिव्ह आला तरी एकदा आरटी -पीसीआर करून खात्री करावी लागते.
ट्रूनॅट टेस्ट
अशा प्रकरची तपासणी आधी टी.बी. व एचआयव्हीसाठी वापरली जायची. ही आरटी-पीसीआरप्रमाणे जनुकीय साहित्य ओळखण्याचे करते. हे काम मशीनद्वारे केले जाते व मशीन खूप छोटे असते म्हणून ते कुठेही वाहून नेता येते. निदानाचा अहवाल अर्ध्या तासात मिळतो.
रॅपिड अँटीबॉडी टेस्ट
या तपासणीत प्रतिकारशक्ती दर्शवणारे अँटीबॉडी हे घटक मोजले जातात. शरीरात ७ दिवसांनंतर त्या निर्माण होतात. म्हणून या टेस्टचे निदान करण्यात काहीही महत्त्व नाही. या अँटीबॉडी दोन प्रकारच्या असतात आयजी एम सात दिवसांनंतर पाझिटिव्ह येते व आयजी जी १० ते १४ दिवसांनंतर तयार होते व पुढे अनेक दिवस शरीरात राहते. ही चाचणी रक्तातून करता येते.
इलायजा टेस्ट
या टेस्टमध्येही रॅपिड अँटीबॉडी टेस्टसारखे अँटीबॉडीज् तपासता येतात. सध्या भारतात फक्त आय जी जी मध्ये आधी होऊन गेलेल्या कोरोना चा संसर्ग तपासण्यासाठीच कीट उपलब्ध आहेत. म्हणून किती लोकसंख्या संसर्गित झाली आहे एवढेच ही तपासणी सांगते.
(लेखक बालरोगतज्ज्ञ
असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)