ZyCoV-D Vaccine: आता मुलांनाही मिळणार कोरोना लस, ‘झायकोव्ह-डी’चे एक कोटी डोस खरेदी करण्याचे केंद्राचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 05:04 PM2021-11-07T17:04:11+5:302021-11-07T17:05:00+5:30
भारताच्या औषध नियामकाने 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठी मंजुरी दिलेली Zycov-D ही पहिलीच लस आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अहमदाबाद येथील झायडस कॅडिला कंपनीच्या 'Zycov-D' या तीन डोसच्या लसीचे एक कोटी डोस खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. याच बरोबर ही लस राष्ट्रीय अँटी-कोरोनाव्हायरस लसीकरण मोहिमेत या महिन्यात सामील होईल. यासंदर्भात अधिकृत सूत्रांनी रविवारी माहिती दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात विकसित करण्यात आलेल्या जगातील पहिल्या डीएनए-आधारित कोविड-19 लसीचा लसीकरण कार्यक्रमात समावेश करण्यासाठी उचलण्यात आलेल्या सुरुवातीच्या पावलांना हिरवा झेंडा दाखवला आहे, असे समजले जाते. ही लस सुरुवातीला वृद्धांना देण्यास प्राधान्य दिले जाईल.
एक कोटी डोसची ऑर्डर -
भारताच्या औषध नियामकाने 12 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या लोकांच्या लसीकरणासाठी मंजुरी दिलेली Zycov-D ही पहिलीच लस आहे. एका आधिकृत सूत्राने सांगितल्यानुसार केंद्र सरकारने झायडस कॅडिलाला झयकोव्ह-डी लसीच्या एक कोटी डोस साठी ऑर्डर दिली आहे. या लसीची किंमत टॅक्स वगळून साधारणपणे 358 रुपये एवढी आहे.
28 दिवसांच्या अंतराने दिले जाणार तीन डोस -
या किंमतीतच 93 रुपये किंमतीच्या ‘जेट एप्लीकेटर’चा खर्चही समाविष्ट आहे. याच्या सहाय्यानेच लसीचा डोस दिला जाईल. या लसीचे तीन डोस 28 दिवसांच्या गॅपने देण्यात येतील. या लसीला 20 ऑगस्टरोजी औषध नियामकची आपात्कालीन वापराची मंजुरी मिळाली आहे.