फॅक्ट चेक: 'या' घरगुती उपायांनी होऊशकतो ब्लॅक फंगसवर इलाज? जाणून घ्या, व्हायरल व्हिडिओ मागील सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 09:52 AM2021-05-26T09:52:31+5:302021-05-26T09:53:23+5:30
पीआयबीने म्हटले आहे, की 'ब्लॅक फंगस एक गंभीर आजार आहे. याचे योग्य वेळी निदान होणे आणि त्यावर उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. (Black Fungus)
मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ब्लॅक फंगस संक्रमण (Black fungus infection) अर्थात म्यूकरमायकोसिसने भयाचे वातावरण निर्माण केले आहे. अनेक राज्यांत ब्लॅक फंगस रुग्ण समोर येत आहेत. या रुग्णांच्या संख्येतही सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अशात, या आजारावरील योग्य उपचार आणि औषधांनीही राज्य सरकारांची चिंता वाढवली आहे. यातच सोशल मिडियावरही ब्लॅक फंगसवरील उपचारांसंदर्भातील काही टिप्स व्हायरल होताना दिसत आहेत. अशाच एका व्हायरल व्हिडिओत, तुरटी, हळद, सेंधव मीठ आणि मोहरीच्या तेलाने म्यूकरमाइकोसिसचा इलाज केला जाऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. तर जाणून घेऊया, या व्हायरल व्हिडिओमागचं सत्य... (CoronsVirus Black fungus infection PIB fact check mucormycosis symptoms and treatment)
पीआयबी फॅक्ट चेक टीमने या व्हायरल व्हिडिओमध्ये करण्यात आलेला दावा फेक असल्याचे म्हटले आहे. तसेच, तुरटी, हळद, सेंधव मिठ आणि मोहरीच्या तेलाने ब्लॅक फंगस संक्रमणावर उपचार केला जाऊ शकतो, याला कसल्याही प्रकारचा वैज्ञानिक आधार नाही. तसेच, अशा कुठल्याही प्रकारच्या गंभीर आजारावरील उपचारांसाठी केवळ घरगुती टिप्सवर विश्वास ठेऊ नये. असेही पीआयबीने म्हटले आहे.
जीवघेणा म्युकोरमायकोसिस आताच का फोफावतोय? खुद्द एम्सच्या संचालकांनी दिली महत्वाची माहिती
पीआयबीने म्हटले आहे, की 'ब्लॅक फंगस एक गंभीर आजार आहे. याचे योग्य वेळी निदान होणे आणि त्यावर उपचार होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे, अशा प्रकारचा कुठलाही घरगुती उपचार करणे टाळावे. या आजारावर कुठलाही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.'
दावा: फिटकरी, हल्दी, सेंधा नमक व सरसों के तेल से #Mucormycosis का इलाज किया जा सकता है#PIBFactCheck:यह दावा #फर्जी है।इस नुस्खे से ब्लैक फंगस के उपचार का कोई वैज्ञानिक प्रमाण नहीं है। कृपया ऐसी किसी भी गंभीर स्वास्थ्य समस्या के उपचार के लिए केवल घरेलू नुस्खों पर विश्वास न करें। pic.twitter.com/x0P5HZQkGx
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 24, 2021
ब्लॅक फंगस संक्रमणाच्या या लक्षणांवर अवश्य लक्ष ठेवा -
एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितल्याप्रमाणे, म्यूकरमायकोसिसची सामान्य लक्षणं पुढीलप्रमाणे असू शकतात -
चेहऱ्यावर एका बाजूला सूज, डोकेदुखी, सायनस, ताप, नाकातून रक्त येणे, नाकाच्या वरच्या बाजूस काळे घाव, जे लवकरच अधिक गंभीर होतात.
#Mucormycosis के कुछ सामान्य लक्षण इस प्रकार हो सकते हैं
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) May 24, 2021
●चेहरे पर एक तरफा की सूजन
●सिरदर्द
●साइनस
●बुखार
●नाक से खून आना
●नाक के ऊपरी हिस्से पर काले घाव जो जल्दी और गंभीर हो जाते हैं : निदेशक, एम्स pic.twitter.com/tbVxaNyb41
ही बुरशी कोठे आढळते?
म्युकोरमायकोसिससंदर्भात बोलताना एका पत्रकार परिषदेत डॉ. गुलेरिया म्हणाले होते, म्युकोरमायसीट्स नामक तंतुमय बुरशीचे तंतू म्युकोरमायकोसिसला कारणीभूत ठरतात. ते हवेत, मातीत, आणि अगदी अन्नातही आढळतात. हवेतील कवकधारी कनांच्या माध्यमातून ते शरीरात शिरकाव करू शकतात किंवा त्वचेला कापणे/भाजणे, अशी दुखापत झाली असल्यास ते त्वचेवरही आढळतात. या संसर्गाचे वेळेवर निदान झाल्यास, संभाव्य अंधत्व किंवा मेंदूचा संसर्ग टाळता येऊ शकतो.
मास्कला पर्याय नाही -
म्यूकोरमायकोसिसपासून बचाव करण्यासंदर्भात गोलेरिया म्हणाले, मास्क घालण्याला पर्याय नाही. हवेतील बुरशीचे सूक्ष्मकण व तंतू नाकावाटे सहज शरीरात प्रवेश करू शकतात. यामुळे, संसर्गास अटकाव करण्याच्या दृष्टीने मास्क घालण्याचे महत्त्व दुपटीने वाढते. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या/ तेथे भेट देणाऱ्या लोकांनी याकडे खासकरून लक्ष द्यायला हवे. एवढेच नाही, तर मास्क दररोज निर्जंतुकही करायला हवे. याच बरोबर, (ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वापरणाऱ्यांच्या बाबतीत) ह्युमिडीफायर म्हणजेच आर्द्रताजनक स्वच्छ ठेवणे व वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. तसेच, ह्युमिडीफायरच्या बाटलीत जंतुविरहित सामान्य सलाईन वापरले पाहिजे व ते दररोज बदलायला हवे, असेही गुलेरिया यांनी म्हटले आहे.