खोकला, सर्दी, ताप... H3N2 इन्फ्लूएंझापासून कधी होणार सुटका? आरोग्य मंत्रालयाने स्पष्टच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 08:25 PM2023-03-10T20:25:09+5:302023-03-10T20:34:11+5:30
कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा कहर लोकांना घाबरवत आहे. हे पाहता सरकारने इन्फ्लूएंझाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.
H3N2 इन्फ्लुएंझाने देशात खळबळ उडवून दिली आहे. यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. देशातील अनेक राज्यात याने हातपाय पसरले आहेत. यामध्ये केरळ, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. कोरोनानंतर H3N2 व्हायरसचा कहर लोकांना घाबरवत आहे. हे पाहता सरकारने इन्फ्लूएंझाबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सर्व राज्यांतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ICMR ने एडव्हायजरी जारी केली आहे. यामध्ये लोकांना खबरदारीच्या पद्धती सांगण्यात आल्या आहेत. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मार्च अखेरीस सीझनल इन्फ्लूएंझा कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
देशात H3N2 इन्फ्लूएंझाची सुमारे 100 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यापैकी काही H1N1 आहेत. आतापर्यंत फक्त या दोन प्रकारचे इन्फ्लूएंझा व्हायरसबाबत माहिती मिळाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, देशातील सर्व राज्यांमध्ये मॉनिटरिंग आणि ट्रॅकिंग केले जात आहे. हे IDSP नेटवर्कद्वारे रिअल टाइम आधारावर केले जात आहे.
विशेषत: सीझनल इन्फ्लूएन्झाच्या H3N2 उपप्रकाराची प्रकरणे निरिक्षणाखाली आहेत. ICMR ने या संदर्भात एक सूचना जारी केली आहे. इन्फ्लूएन्झा टाळण्यासाठी लोकांनी कोणती खबरदारी घ्यावी हे सांगण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की मार्च अखेरीस इन्फ्लूएन्झा कमी होण्याची अपेक्षा आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने सांगितले की, भारतात गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सतत खोकला आणि तापासह सर्दी होण्याचे कारण म्हणजे 'इन्फ्लुएंझा ए' चा 'H3N2' उपप्रकार आहे. त्याच वेळी, इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरात वाढत्या खोकला आणि सर्दी प्रकरणांमध्ये अँटीबायोटिकच्या अतिवापराबद्दल इशारा दिला होता.
H3N2 व्हायरस हा इन्फ्लूएंझा A चा उपप्रकार आहे. त्याला हाँगकाँग फ्लू असेही म्हणतात. सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत. बहुतेक प्रकरणांमध्ये, हा विषाणू शरीराच्या रोगांपासून संरक्षण करणाऱ्या व्हाईट ब्लड सेल्स (WBC) कमी करतो. यामुळे ल्युकोपीनिया होतो. जेव्हा रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असते तेव्हा व्हायरसमुळे गंभीर स्थिती निर्माण होते.
H3N2 व्हायरसमुळे तापातून बरे होण्यासाठी 5-7 दिवस लागतात. खोकला निघून जाण्यासाठी 3-4 आठवडे लागतात. यामध्ये पॅरासिटामॉल घेता येते. या व्हायरल इन्फेक्शनमध्ये अँटिबायोटिक्स न घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यांच्या मते, यामुळे शरीरात अँटीबायोटिक प्रतिरोधक क्षमता निर्माण होऊ शकते. त्यामुळे समस्या आणखी वाढू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"