खोकला, ताप, अंगावर; न्यूमोनियाचा धोका! नागरिकांत मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ची साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 09:09 AM2023-10-16T09:09:58+5:302023-10-16T09:10:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ची साथ आहे. अनेकांना तापासोबत खोकला, ताप, डोकेदुखी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ची साथ आहे. अनेकांना तापासोबत खोकला, ताप, डोकेदुखी, घसादुखी, अंगदुखी, उलट्या, थकवा, श्वास घेण्यास त्रास या स्वरुपाची लक्षणेही दिसतात. रक्त चाचण्यांचे निदान करून सुद्धा कुठलाही विशेष आजार नसल्याचे दिसून येत आहे. डॉक्टर सुद्धा लक्षणानुसार उपचार करत आहेत.
ताप कमी होत असला तरी खोकला मात्र अनेक दिवस राहत असल्याच्या तक्रारी करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे; मात्र हा खोकला काही काळ राहिला तर न्यूमोनिया होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. सध्या या व्हायरल आजारासोबत डासांच्या आजारांचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या साथीच्या आजारांच्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार डेंग्यू आणि मलेरिया हे डासांपासून होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
त्यामुळे एका बाजूला व्हायरल आजार आणि दुसऱ्या बाजूला साथीचे आजार यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. मुंबईतील सर्वच सार्वजनिक रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणात या आजाराचे रुग्ण आढळून येत आहेत.
न्यूमोनिया म्हणजे काय
सोप्या शब्दात सांगायचं झाले तर फुप्फुसात जिवाणू किंवा विषाणूच्या बुरशीमुळे निर्माण झालेला संसर्ग होय. त्याला अनेकवेळा फुप्फुसात पाणी झाले आहे, असेही म्हणतात.
श्वसनमार्गाचा हा आजार लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे खोकला एका विशिष्ट कालावधीनंतर सुद्धा थांबत नसल्यास डॉक्टरांकडे जाणे गरजेचे असते. कारण वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर न्यूमोनियाच्या आजारांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते.
कोणत्याही तापाच्या आजाराकडे दुर्लक्ष करू नका. आजार झाला असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. आजाराचे स्वरूप छोटे किंवा मोठे याचा निर्णय स्वतः घेऊ नका तसेच औषधांचा वापर करू नका. अन्यथा आजार बळावण्याची शक्यता अधिक असते. काही आजाराच्या निदानासाठी रक्त चाचण्यांची गरज असते. त्यामुळे योग्यवेळी योग्य चाचण्या करण्याची गरज असते. त्यानंतर निदान झाल्यानंतर उपचारपद्धती निश्चित केली जाते. व्हायरल आणि साथीचे आजार सध्या सुरू असले तरी रुग्णांना नेमके काय झाले आहे, ही लक्षणे पाहिल्यावर निदान करणे शक्य होते. ओपीडीत मोठ्या संख्येने हे रुग्ण येत असतात.
- डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, वैद्यकशास्त्र विभाग, जे जे रुग्णालय