रात्री येणाऱ्या खोकल्यामुळे झोपेचं खोबरं होऊ द्यायचं नसेल तर वेळेवर करा 'हे' सोपे उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:31 PM2020-02-19T12:31:42+5:302020-02-19T12:37:11+5:30
रात्री सर्वात जास्त खोकला त्या लोकांना येतो ज्यांच्या श्वसननलिकेत म्यूकस वाढतो. ही समस्या सामान्यपणे सायनसने पीडित लोकांसोबत अधिक होते.
(Image Credit : healthspectra.com)
वातावरण बदलामुळे किंवा काही चुकीचं खाल्ल्यामुळे अनेकांना लगेच खोकला होतो आणि त्यांची स्थिती वाईट होते. अनेकांना फक्त रात्री इतका खोकला येतो की, त्यांच्या झोपेचं खोबरं झाल्याशिवाय राहत नाही. पण कधी तुम्ही याचा विचार केलाय का की, रात्री खोकला का येतो? कदाचित अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. पण याकडे दुर्लक्ष करणं चांगलंच महागात पडू शकतं. आज आम्ही तुम्हाला खासकरून रात्री खोकला येण्याची कारणं आणि त्यावरील उपाय सांगणार आहोत.
रात्री सर्वात जास्त खोकला त्या लोकांना येतो ज्यांच्या श्वसननलिकेत म्यूकस वाढतो. ही समस्या सामान्यपणे सायनसने पीडित लोकांसोबत अधिक होते. अशात लगेच काही उपाय करून तुम्ही हा खोकला दूर करू शकता आणि निवांत झोप घेऊ शकता.
खोकला आल्यावर काय कराल?
सायनसच्या रूग्णांना नेहमीच म्यूकस वाढल्याने रात्री खोकला येऊ लागतो. त्यामुळे सायनसच्या रूग्णांनी म्यूकस वाढू देऊ नये. त्यासाठी रात्री चिकट पदार्थ जसे की, तूप किंवा लोणी खाऊ नये. याने खोकला अधिक वाढतो.
मध आणि आल्याचं सेवन
रात्री जर तुम्हाला अचानक खोकला येत असेल तर आलं बारीक करून त्यात काही थेंब मध घाला. हे मिश्रण काही वेळ चाटत रहा. याने तुमचा खोकला दूर होईल.
हेही असू शकतं कारण
रात्री खोकला येण्याचं कारण हेही असू शकतं की, तुमची रूम स्वच्छ नसेल. म्हणजे तुमच्या रूममधील फॅनवर किंवा पडद्यांवर धूळ असेल तर तुम्हाला खोकला येऊ शकतो. त्यामुळे रूम नियमित स्वच्छ ठेवा. धूळ नाकेवाटे फुप्फुसात जाते आणि खोकला येऊ लागतो.
कफमुळेही येतो खोकला
कफ झाल्यामुळे तुम्हाला रात्री अचानक खोकला येऊ शकतो. त्यामुळे कफ दूर करण्यासाठी वेळीच कफ साफ करणारं एखादं औषध घ्या. याने तुम्हाला शांत झोप लागेल.
गरम पाणी प्या
रात्री येणारा खोकला गरम पाण्याचा वापर करूनही दूर केला जाऊ शकतो. गरम पाण्यामुळे घशातील बॅक्टेरिया नष्ट होतात. तसेच कफही याने विरघळतो आणि तुमचा खोकला थांबतो.