Coronavirus : दिलासादायक! Covaxin कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात 65.2 टक्के प्रभावी, क्लिनिकल चाचणीचा डेटा प्रकाशित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 09:31 AM2021-11-12T09:31:50+5:302021-11-12T09:32:22+5:30
Coronavirus : द लॅन्सेट जर्नलच्या मते, कोरोना व्हायरसच्या अधिक वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कोव्हॅक्सिन ही लस 65.2 टक्के प्रभावी आहे.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसवर (Coronavirus) मात करण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, असे असले तरीही कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट (Delta Variant) चिंतेचा विषय बनला आहे. भारतातील दुसरी लाट याचाच परिणाम होती. कोरोना लस घेतलेल्या व्यक्तींनाही डेल्टा व्हेरिएंटने संक्रमित केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे याविरोधात लढण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (Covaxin) या भारतीय लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणीचा डेटा प्रकाशित झाला आहे.
द लॅन्सेट जर्नलच्या मते, कोरोना व्हायरसच्या अधिक वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटविरूद्ध कोव्हॅक्सिन ही लस 65.2 टक्के प्रभावी आहे. देशात आणि जगात कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अजूनही चिंतेचा विषय बनला आहे. तसेच, भारतातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमागे डेल्टा व्हेरिएंटचे संक्रमण असल्याचे मानले जाते.
भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना वाचवण्यासाठी 77.8 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. कोरोनाच्या गंभीर आजारापासून (गंभीर लक्षणात्मक कोरोनाची प्रकरणे) संरक्षण करण्यासाठी कोव्हॅक्सिन 93.4 टक्के प्रभावी आहे. लक्षणे नसलेल्या कोरोनापासून संरक्षण देण्यासाठी 63.6% प्रभावी आहे.
गंभीर AEFI (लसीकरणानंतरच्या प्रतिकूल परिणामांची गंभीर प्रकरणे) फक्त 0.5% पेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. भारतीय लस कोव्हॅक्सिन SARS-CoV-2 व्हायरसच्या सर्व व्हेरिएंटविरोधात 70.8 टक्के संरक्षण प्रदान करते. भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांनी कोव्हॅक्सिन विकसित केली आहे.
दरम्यान, मेडिकल जर्नलने म्हटले आहे की, डेल्टा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डाने लसीशी संबंधित कोणत्याही सुरक्षेची चिंता व्यक्त केलेली नाही. फेज-3 चाचणीमधील परिणामकारकता आणि सुरक्षिततेचे मूल्यांकन करण्यासाठी केलेल्या या अभ्यासात भारतातील 25 ठिकाणी 25,800 स्वयंसेवकांचा समावेश होता.
फ्रान्समध्ये पाचवी, जर्मनीत चौथी लाट! डेल्टा व्हायरसने चिंता वाढविली
रशियानंतर आता फ्रान्समध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. ब्रिटन, रशिया आणि जर्मनीनंतर तिथे लाट येऊ लागली आहे. फ्रान्सचे आरोग्य मंत्री ऑलिवर वेरन यांनी सांगितले की, पाचव्या लाटेची सुरुवात झाली आहे. दुसरीकडे रशियामध्ये 83 टक्के हॉस्पिटलमधील बेड भरलेले आहेत. तसेच 12 क्षेत्रांतील काही हॉस्पिटलमध्ये केवळ दोन ते तीन दिवसांचाच ऑक्सिजन उरला आहे. तर जर्मनीमध्ये चौथी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.