'ओमिक्रॉन'विरोधात कोव्हिशिल्ड व कोव्हॅक्सिन लस प्रभावी आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 09:59 PM2021-11-27T21:59:06+5:302021-11-27T22:01:50+5:30
Omicron Coronavirus Variant : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना नवीन व्हेरिएंटविरुद्ध सक्रिय राहण्याचे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत SARS-CoV-2 चा नवीन व्हेरिएंट 'ओमिक्रॉन' (Omicron) समोर आल्यानंतर अनेक देशात पुन्हा भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भारताची सुद्धा कोरोनाच्या या व्हेरिएंटबाबत चिंता वाढली आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना नवीन व्हेरिएंटविरुद्ध सक्रिय राहण्याचे आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे निरीक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.
दक्षिण आफ्रिकेने बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) नवीन व्हेरिएंटची माहिती दिली आणि बोत्सवाना, बेल्जियम, हाँगकाँग आणि इस्रायलमध्येही हा व्हेरिएंट असल्याचे म्हटले आहे जात आहे. कोरोना व्हायरसचा नवीन व्हेरिएंट अधिक संक्रमक असल्याचे म्हटले जात आहे. या व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने 'Omicron' असे नाव दिले आहे.
आतापर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीज विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा म्हणाले की, कोरोनावर वापरल्या जाणार्या mRNA लस ओमिक्रॉनवर परिणामकारक ठरू शकत नाहीत. पांडा म्हणाले, “mRNA लसी स्पाइक प्रोटीन आणि रिसेप्टर इंटरॅक्शनकडे निर्देशित केल्या जातात. त्यामुळे mRNA लसींना कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमध्ये आलेल्या बदलांशी जुळवून घेणे आवश्यक आहे, परंतु सर्व लसी सारख्या नसतात.
कोव्हिशिल्ड ( Coveshield) आणि कोव्हॅक्सिन (Covaxin) आपल्या शरीरात एक वेगळ्या अँटीजन सादरीकरणाद्वारे (Antigen Presentation) प्रतिकारशक्ती (Immunity)निर्माण करतात. शास्त्रज्ञांनी आतापर्यंत ओमिक्रॉनमध्ये संरचनात्मक बदल पाहिले आहेत, परंतु हा व्हेरिएंट कोरोनाच्या इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक प्राणघातक आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक आहे, असे डॉ. पांडा यांनी सांगितले.
डॉ पांडा म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटनेने या सर्व गोष्टींचा तपास केला आहे आणि या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर संसर्ग होत आहे की गंभीर स्वरूपाचा आजार किंवा अधिक मृत्यू होत आहेत, हे शोधण्यासाठी आम्हाला आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटने या व्हेरिएंटला चिंताजनक (Variant of Concern) असे म्हटले आहे. दरम्यान, या व्हेरिएंटमध्ये 10 उत्परिवर्तन (Mutations)असल्याचे शास्त्रज्ञांना आधीच अभ्यासात आढळून आले आहे.