Corona Vaccine : कोव्हॅक्सिन लस कोरोनावर ५० टक्के प्रभावी, दिल्लीतील संशोधन; लॅन्सेटमध्ये लेख प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:20 AM2021-11-25T10:20:41+5:302021-11-25T10:21:17+5:30
ही लस सुरक्षित असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या संस्थेच्या रुग्णालयातील २,७१४ कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची या अभ्यासासाठी तपासणी करण्यात आली.
भारताची स्वदेशी बनावटीची व दोन डोसची कोवॅक्सिन लस कोरोनाविरोधात ५० टक्के प्रभावी ठरली आहे, असे लॅन्सेटच्या साथरोगविषयक वैद्यकीय नियतकालिकाने म्हटले आहे. दिल्लीत या संदर्भात झालेल्या अभ्यासाच्या अंतरिम निष्कर्षांवर आधारित लेख लॅन्सेटच्या साथरोगविषयक नियतकालिकाने प्रसिद्ध केला आहे.
ही लस सुरक्षित असल्याचेही या अभ्यासात म्हटले आहे. दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या संस्थेच्या रुग्णालयातील २,७१४ कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची या अभ्यासासाठी तपासणी करण्यात आली. ही प्रक्रिया १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत पार पडली. या कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली.
देशात डेल्टा विषाणूने कहर माजविला होता त्या काळात हा अभ्यास करण्यात आला. कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस भारत बायोटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या संयुक्त सहभागाने विकसित केली आहे.
देशातील १८ वर्षे पूर्ण केलेल्या व त्यापुढील वयाच्या लोकांना यंदा जानेवारीपासून कोव्हॅक्सिन लस देण्यास प्रारंभ झाला. जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली.
एम्समधील औषध विभागाचे प्राध्यापक मनीष सोनेजा यांनी सांगितले की, कोरोनावर कोव्हॅक्सिन किती प्रभावी आहे, हे शोधण्याचा या अभ्यासामागे उद्देश होता. डेल्टा विषाणूवर ही लस किती परिणामकारक आहे हेदेखील तपासण्यात आले. लसीकरणामुळे तसेच मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे या उपायांमुळेही कोरोना प्रसार रोखण्यास खूप मदत झाली आहे.
‘एम्स’च्या सर्व कर्मचाऱ्यांना दिली कोव्हॅक्सिन
एम्सने आपल्या २३ हजार कर्मचाऱ्यांना जानेवारीपासून कोव्हॅक्सिन लसच दिली होती. मे महिन्यात झालेल्या पाहणीत आरटी-पीसीआर चाचणी केलेल्या एम्सच्या २७१४ कर्मचाऱ्यांपैकी १,६१७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले तर १०९७ जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला होता.
देशात कोरोनाच्या ४३७ मृत्यूंत केरळचे ३७०
कोरोना विषाणूला प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांमधील अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांनी या लोकांनी कोराेना प्रतिबंधक नियमांचे पालनही केले होते हे विशेष. दिल्लीतील दोन रुग्णालयांत करण्यात आलेल्या या अभ्यासात लसीकरणामुळे विषाणूच्या गंभीर परिणामांना रोखता जरी आलेे तरी कोरोनाची बाधा होण्याचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. हा अभ्यास इन्सॅकोग कॉन्सॉर्टियम, सीएसआयआर आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या संशोधकांनी केला.