लोकल प्रवासासाठी कोव्हॅक्सिनच्या मागणीत होतेय वाढ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 17:20 IST2021-08-27T17:11:18+5:302021-08-27T17:20:40+5:30
लोकल प्रवासासाठी लसीचे दोन डोस बंधनकारक असल्याने नागरिक आता लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी घाई करताना दिसतायत. दरम्यान यामध्ये कोव्हॅक्सिन लसीची मागणी वाढताना दिसतेय.

लोकल प्रवासासाठी कोव्हॅक्सिनच्या मागणीत होतेय वाढ?
कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारकडून देण्यात आली. तसेच मॉल आणि उपहारगृहांमध्ये देखील लसीचे दोन डोस बंधनकारक असल्याने नागरिक आता लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी घाई करताना दिसतायत. दरम्यान यामध्ये कोव्हॅक्सिन लसीची मागणी वाढताना दिसतेय.
कोव्हिशिल्डच्या दोन डोसांमध्ये ८४ दिवसांचं अंतर आहे. तर कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसातील अंतरामध्ये २८ दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा डोस लवकरात लवकर पूर्ण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिक कोव्हॅक्सिन घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
सरकारी लस केंद्रावर कोव्हॅक्सिन उपलब्ध नाहीये. मात्र, असं असातानाही लोकं खाजगी लसीकरण केंद्रांची वाट धरत असल्याचं समोर आलं आहे. नाईलाजाने नागरिकांना लसीच्या दोन डोसांसाठी २७०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात खासगी रुग्णालयातील कोव्हॅक्सिनचे लसीकरण वाढले आहे.