Covaxin चे दोन्ही डोस Symptomatic कोरोना रुग्णांमध्ये 50 टक्के प्रभावी, स्टडीतून दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 08:35 AM2021-11-24T08:35:21+5:302021-11-24T08:36:46+5:30
Covaxin shows 50% effectiveness : लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय लसींच्या रिअल वर्ल्ड असेसमेंटमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : कोवॅक्सिनचे दोन्ही डोस कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये 50 टक्के प्रभावी आहेत. लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या भारतीय लसींच्या रिअल वर्ल्ड असेसमेंटमध्ये हा दावा करण्यात आला आहे.
द लॅन्सेटमध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या पीअर-रिव्ह्यूमध्ये असे दिसून आले आहे की, कोवॅक्सिन कोरोनाविरूद्ध प्रभावी आहे आणि कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये ती 77.8 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहे. शिवाय, लसीचा गंभीर परिणाम होत नाही.
एम्समध्ये झाली स्टडी
नवीन स्टडीनुसार, 15 एप्रिल ते 15 मे दरम्यान दिल्लीच्या एम्समधील 2714 आरोग्य कर्मचाऱ्यांवर ही स्टडी करण्यात आली, यामध्ये ज्यांना कोरोनाची लक्षणे होती आणि त्यांची आरटी-पीसीआर चाचणीही करण्यात आली. रिपोर्टनुसार, जेव्हा ही स्टडी करण्यात आली, तेव्हा भारतात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता आणि हा व्हेरिएंट 80 टक्के कोरोना प्रकरणांमध्ये आढळला होता.
हैदराबादस्थित भारत बायोटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (NIV-ICMR), पुणे यांच्या सहकार्याने कोवॅक्सिन विकसित केली आहे. कोवॅक्सिनचे दोन्ही डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जातात. यावर्षी जानेवारीमध्ये, कोवॅक्सिनला भारतात 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या महिन्यात आपत्कालीन वापरासाठी कोवॅक्सिनला मान्यता दिली आहे.
यापूर्वी, लॅन्सेटने आपल्या रिव्ह्यू रिपोर्टमध्ये दावा केला होता की, कोवॅक्सिन लक्षणे असलेल्या कोरोनाविरुद्ध 77.8 टक्के प्रभावी ठरली आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोरोनाविरोधात कोवॅक्सिन 93.4 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले. लक्षणे नसलेल्या कोरोनाविरूद्ध कोवॅक्सिन 63.6 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले. तसेच, SARS-CoV-2, B.1.617.2 डेल्टा विरुद्ध 65.2 टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले.