लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची क्वारंटाईन आणि कोरोना चाचणीपासून सुटका होणार?, तज्ज्ञांची शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:45 PM2021-07-08T21:45:16+5:302021-07-08T21:46:48+5:30
कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना नागरिकांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.
कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना नागरिकांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही डोस पूर्ण केलेल्या नागरिकांना प्रवासादरम्यान क्वारंटाईन करणं किंवा त्यांची कोरोना चाचणी देखील केली जाऊ नये अशी शिफारस तज्ज्ञांनी केली आहे. कोरोना लसीसाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय तज्ज्ञांच्या समितीनं आणि लसीकरणासाठी निर्धारित करण्यात आलेल्या तांत्रिक अॅडवायझरी ग्रूपनं आरोग्य मंत्रालयासोबत झालेल्या बैठकीत याबाबतची शिफारस केली आहे.
कोविड-१९ वर्किंग ग्रूपचे चेअरमन डॉ.एनके अरोडा देखील या बैठकीत सहभागी होती. तज्ज्ञांनी केलेली शिफारस देशाबाहेर प्रवास करणाऱ्या नागरिकांसंदर्भातील असल्याचं त्यांनी सांगितलं. यासोबतच ज्यांनी कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि त्यांना याआधी कोरोनाची लागण होऊन गेली आहे अशा नागरिकांनाही देशांतर्गत प्रवासादरम्यान क्वारंटाइन, कोरोना चाचणीपासून सवलत द्यावी, असाही प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या बैठकीत झालेल्या चर्चेचे सविस्तर मुद्दे राज्यांना देखील पाठविण्यात आले आहेत जेणेकरुन याबाबत संबंधित राज्य सरकारांना पुढील निर्णय घेता येईल.
लसीकरण पूर्ण झालेले व्यक्ती कोण?
कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेऊन कमीत कमी दोन आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला आहे, अशाच नागरिकांना लसीकरण पूर्ण झालेले नागरिक म्हणता येईल. तज्ज्ञांच्या बैठकीत चर्चा झालेले मुद्दे सार्वजनिक करण्यात आलेले असले तरी अजूनही काही राज्यांमध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांकडेही आरटीपीसीआर चाचणीची मागणी केली जात आहे. विविध राज्यांच्या विविध नियमांमुळे नागरिक आणि ट्रॅव्हल कंपन्यांना देखील मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.
"तज्ज्ञांच्या शिफारसी केलेल्या असूनही अनेक राज्यांमध्ये अजूनही प्रतिबंध कायम आहेत. त्यामुळे यात केंद्रानं लक्ष घालून एक सर्वसमावेशक आदेश जारी करण्याची गरज आहे", असं ट्रॅव्हल एजंट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा ज्योती मायल यांनी सांगितलं.