मोठा दिलासा! भारतातील बहुतेक लोकांना कोरोना लसीची गरज भासणार नाही?; एम्सच्या डॉक्टरांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 11:23 AM2020-11-15T11:23:59+5:302020-11-15T11:30:28+5:30
CoronaVirus News & Latest Updates : कोरोनाची लस येण्याआधी भारतीयांची प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. कोरोनाचे स्वरुप कदाचित बदलणार नाही
कोरोना व्हायरसने गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून भारतासह संपूर्ण जगभरात कहर केला आहे. कोरोना व्हायरसची लस कधी तयार होणार याकडे संपूर्ण जगभरातील लोकांचे लक्ष आहे. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी संपूर्ण जगभरातील वैज्ञानिक आणि डॉक्टर प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कोरोनाच्या संक्रमणाबाबत तसंच लसीकरणाबाबत एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या पाहून एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोनाची लस येण्याआधीच भारतीयांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लागणारी इम्युनिटी तयार होईल असा दावा केला आहे.
दिल्लीप्रमाणेच भारतातील इतर राज्यात वाढत जाणारं प्रदूषण, दिवाळीची एकूण परिस्थिती पाहता कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. याशिवाय थंडीमुळे पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांचा आकडा वेगानं वाढू शकतो असं काही तज्ज्ञांचं म्हणणं असतानाच एम्सच्या डॉक्टरांनी केलेला दावा हा दिलासादायक ठरत आहे. कोरोनाबाबत माहिती देताना डॉ. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, ''आपण ज्या प्रकारचा ट्रेंड पाहत आहोत. ते पाहिल्यानंतर आपण असे म्हणू शकतो की देशात कोरोनाची लस येण्याआधी भारतीयांची प्रतिकारशक्ती विकसित होऊ शकते. कोरोनाचे स्वरुप कदाचित बदलणार नाही.''
पुढे त्यांनी सांगितले की,'' येत्या काळात आपण अशा टप्प्यावर पोहोचू शकतो जेथे देशातील नागरिकांमध्ये रोग प्रतिकारशक्ती इतकी वाढू शकते की त्यांना लसीची गरज देखील भासेल की नाही याबाबत शंका आहे. कोरोनाग्रस्तांची होणारी घट ही दिलासा देणारी बाब आहे. पण येत्या काळात थंडीचा कडाका वाढला आणि प्रदूषण जास्त असेल तर कोरोनाचे विषाणू हवेत अधिक काळ जिवंत राहू शकतात आणि वेगानं पसरण्याचा धोका देखील आहे. कोरोना अजून संपलेला नाही आणि नागरिकांनी याचं भान ठेवायला हवं . सोशल डिस्टेंसिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझर या गोष्टींची काळजी घ्यायला हवी.'' असं मत यावेळी डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केलं.कोरोनाच्या माहामारीने वाढला 'या' घातक आजाराचा धोका; २३ वर्षांनी रेकॉर्ड तोडला
दरम्यान सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत सध्या जगात दुसऱ्या स्थानावर आहे. भारतात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी सर्वाधिक आहे. सर्वाधिक मृत्यूंच्या संख्येत देशाचा क्रमांक जगात तिसरा आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांच्या बाबतीत देश चौथ्या स्थानी आहे. राज्यात शनिवारी कोरोनाच्या ४ हजार २३७ बाधितांचे निदान झाले असून १०५ मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ४४ हजार ६९८ झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत ४५ हजार ९१४ रुग्णांनी जीव गमावला आहे. राज्यातील मृत्युदर २.६३ टक्के आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात नोंद झालेल्या एकूण १०५ मृत्यूंपैकी ५० मृत्यू हे मागील ४८ तासांतील आहेत, तर १२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ४३ मृत्यू हे एक आठवड्यापूर्वीच्या कालावधीतील आहेत. पुढच्या महिन्यात कोरोना लसीचे १० कोटी डोस तयार करणार; सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख म्हणाले की..