सावधान! कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये वाढतोय सिझोफ्रेनियाचा धोका; रिसर्चमध्ये खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 11:21 AM2024-01-06T11:21:29+5:302024-01-06T11:25:52+5:30
एका नवीन रिसर्चमध्ये सिझोफ्रेनिया आणि गंभीर कोरोना संसर्ग यांच्यातील संबंध आढळून आला आहे.
कोरोना महामारीने पुन्हा एकदा सर्वांना घाबरवायला सुरुवात केली आहे. कोरोना JN.1 च्या नवीन व्हेरिएंटमुळे देशभरातील समस्या वाढल्या आहेत. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, या आजाराशी संबंधित एक नवीन अभ्यास समोर आला आहे. नवीन रिसर्च धडकी भरवणारा आहे. एका रिसर्चनुसार, कोरोना व्हायरसचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
एका नवीन रिसर्चमध्ये सिझोफ्रेनिया आणि गंभीर कोरोना संसर्ग यांच्यातील संबंध आढळून आला आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या रिसर्चमध्ये अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असं आढळून आलं की ज्यांना कोविड-19 संसर्ग झाला आहे त्यांना सिझोफ्रेनियाचा त्रास हा कोरोना न झालेल्या लोकांपेक्षा चार पटीने जास्त आहे.
क्लोझापाइन थेरपी घेणार्या लोकांसाठी लसीकरणाच्या धोरणांची काळजीपूर्वक तपासणी करण्याची गरज देखील या रिसर्चमध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर तरुणांना SSPD (सिझोफ्रेनिया स्पेक्ट्रम आणि मानसिक विकार) होण्याचा धोका वाढतो, असंही या रिसर्चमध्ये समोर आलं आहे.
सिझोफ्रेनिया हा एक मानसिक आजार आहे. या विकाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला वास्तव किंवा त्याचे विचार व्यक्त करण्यात अडचण येते. तसेच सामाजिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही समस्यांना तोंड द्यावं लागतं. सिझोफ्रेनियाने ग्रस्त व्यक्तीचा वास्तविकतेशी संपर्क तुटतो आणि यामुळे त्यांचे विचार, भावना आणि वागण्यावर परिणाम होतो. या मानसिक विकाराने ग्रस्त व्यक्ती अशा गोष्टी पाहते किंवा ऐकते ज्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही.